संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com
पुणे : पुणे महानगरपालिका अंतर्गत चालणारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गेल्या काही वर्षांत वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी, प्रवेश प्रक्रियेत कथित भ्रष्टाचार, तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) नोटिसांमुळे या महाविद्यालयाच्या मालकी, नियंत्रण आणि जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय हे खासगी मेडिकल असोसिएशनचे नाही. ते राज्य सरकारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांप्रमाणे थेट राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाखालीही नाही. हे एक “महापालिका-प्रणित” वैद्यकीय महाविद्यालय आहे, जे ट्रस्ट मॉडेलवर चालवले जाते. यामुळेच प्रशासनात अनेक स्तर निर्माण झाले आहेत.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
पुणे महानगरपालिका (PMC Medical Education Trust), राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे काही नियामक नियंत्रण यात मालकी आणि नियंत्रणाचे विभाजन असल्याने प्रत्यक्ष जबाबदारी ठरवताना गोंधळ निर्माण होत असल्याची टीका होत आहे. यामुळे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय नेमके कोणाचे? खासगी की सरकारी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
महाविद्यालयातील इन्स्टिट्यूशनल कोट्यांमधील MBBS शुल्क लाखोंमध्ये असल्याची माहिती समोर आली होती. ACB कारवाईदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार एका विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी वार्षिक सुमारे ₹22.5 लाख शुल्क आकारले जात असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
काही प्रश्न उपस्थित होतात:
महापालिकेच्या महाविद्यालयात इतके जास्त शुल्क का?
हे महाविद्यालय ‘सार्वजनिक’ की ‘अर्ध-खासगी’ पद्धतीने चालते?
शुल्क नियंत्रण कोण करते?
गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रत्यक्षात उपलब्ध आहे का?
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आशिष बांगिणवार यांना MBBS प्रवेशासाठी कथित ₹16 लाख लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 2023 मध्ये अटक केली होती. प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. संस्थात्मक नियंत्रणातील त्रुटी उघड झाल्या आहेत. PMC प्रशासनालाही चौकशी समिती नेमावी लागली असून, या घटनेनंतर महाविद्यालयाच्या प्रशासनिक उत्तरदायित्वावर मोठा वाद निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने 2025 मध्ये या महाविद्यालयातील त्रुटींवर कठोर निरीक्षण नोंदवत PMC ला नोटीस बजावल्याचे वृत्त समोर आले असून, त्यामध्ये अपुऱ्या सुविधा, अध्यापकांची कमतरता, प्रशासकीय विस्कळीतपणा, अध्यापनातील त्रुटी यांचा उल्लेख करण्यात आला होता. सुधारणा न झाल्यास दंड किंवा मान्यता धोक्यात येऊ शकते, असा इशाराही देण्यात आला होता.
वैद्यकीय महाविद्यालय चालवण्याबाबत नियम काय सांगतात…
भारतात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आणि चालवण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग चे नियम लागू होतात. संस्थेने जर नियमांचे पालन केले नाही तर प्रवेशबंदी, दंड, मान्यता निलंबन, प्रवेशसंख्या कमी करणे अशी कारवाई होऊ शकते.
मुख्य प्रश्न अजूनही कायम…
या संपूर्ण प्रकरणातून काही गंभीर प्रश्न समोर येतात:
महापालिकेने मेडिकल कॉलेज चालवणे हे तिचे मुख्य काम आहे का?
ट्रस्ट मॉडेलमुळे उत्तरदायित्व धूसर झाले आहे का?
सार्वजनिक संस्थेत खासगी पद्धतीचे शुल्क का?
विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण कोण करणार?
NMC च्या निरीक्षणानंतरही सुधारणा का होत नाहीत?
दरम्यान, आज स्थिती अशी आहे की महाविद्यालय ‘सार्वजनिक’ नावाने चालते, पण शुल्क आणि प्रशासनावरून ‘अर्ध-खासगी’ मॉडेलसारखी टीका होत आहे. आणि म्हणूनच सर्वात मोठा प्रश्न उरतो, चूक झाली तर जबाबदार नेमके कोण? विविध प्रश्नांमुळे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय चर्चेत आहे.
(क्रमशः)
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय नेमके कोणाचे? खासगी की सरकारी? https://t.co/fRwN9ekkOF @PMCPune @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @supriya_sule @PawarSpeaks @RRPSpeaks @CMOMaharashtra @PMOIndia @SantoshDhaybar @mohol_murlidhar pic.twitter.com/0qW3cUrtoJ
— mahabharat news (@mahabharatnewss) May 9, 2026
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासकीय गोंधळामुळे चर्चेत!