पुणे : पुणे शहरातील मंगळवार पेठेत असलेल्या कमला नेहरू रुग्णालयात चतुर्थ श्रेणीमधील काही महिला कर्मचाऱ्यांनी अचानक घोषणाबाजी करत रुग्णालयातील कामकाजात गोंधळ निर्माण केला. काही महिला कर्मचारी कामासाठी नेमून दिलेली वेळ पाळत नसल्यामुळे त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी धुडगूस घालत रुग्णालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण केला आहे.
कमला नेहरू रुग्णालयात शासन नियमाने तिन्ही शिफ्टमध्ये काम करणे बंधनकारक आहे. परंतु, काही महिला कर्मचारी सकाळची शिफ्ट करण्यास नकार देत आहेत. शिवाय, कामावर वेळत न येणे आणि लवकर जाणे, असे वांरवार त्यांच्याबाबत घडत होते. संबंधित कर्मचाऱ्यांना वेळेचे पालन करण्याबाबत अनेकदा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्या महिलांनी राजकीय दबावतंत्राचा वापर सुरू केला आणि रुग्णालयाच्या परिसरात घोषणाबाजी सुरू केली. या संपूर्ण गदारोळामुळे काही काळ रुग्णालयातील सेवा प्रभावित झाल्या होत्या. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना त्रास सहन करावा लागला. घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली.
रुग्णालय प्रशासनाने सांगितले, ‘रुग्णांची काळजी घेणे हेच आमचे पहिले कर्तव्य आहे. शिस्त पाळणे आणि वेळेत हजर राहणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे उत्तरदायित्व आहे. प्रत्येकाने नेमूण दिलेल्या वेळेत कामावर हजर राहणे आवश्यक आहे. रुग्णांच्या सेवेवर परिणाम होता कामा नये. परंतु, काही महिला कर्मचाऱ्यांना कोणतेही बंधन नको आहे. सातत्याने त्या मनमानी करण्याचा प्रयत्न करतात. राजकीय दबावतंत्राचा वापर करत दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, अशा प्रकारचा गोंधळ कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. प्रत्येकाने कामकाजाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. संबंधितांना समज देण्यात येणार आहे. शिवाय, गरज पडल्यास पोलिस दलाची मदत घेतली जाईल. कारण, रुग्णालयाची शिस्त आणि रुग्णांची सेवा महत्त्वाची आहे. पुढील कारवाईसाठी संबंधित विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.’