पुणे : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सोमेश्वर कारखान्यासाठी एकत्रित पॅनल उभे करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार या चर्चेत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसल्याचे समोर येत आहे. यामुळे बारामतीत पुन्हा पवार vs पवार असा सामना रंगणार आहे.
पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित राज्यामध्ये उच्चांकी भाव देणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. 21 संचालकांच्या जागांसाठी विविध गट आणि पक्षांच्या वतीने तब्बल 514 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या, 30 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असताना आजपर्यंत केवळ तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
View this post on Instagram
विशेष म्हणजे, निवडणुकीसाठी विविध राजकीय गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असले तरी अद्याप कोणत्याही प्रमुख गटाने अधिकृत पॅनल जाहीर केलेले नाही. त्यामुळे अंतिम क्षणी कोणत्या गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1991 पासून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या प्रभावाखाली असलेल्या सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा विविध राजकीय गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभे करण्याची तयारी सुरू आहे. तर भाजपाकडून माजी आमदार संजय जगताप आणि अशोक टेकवडे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच शिवसेना शिंदे गटाकडून माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
मेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत उद्या संपत असतानाही अद्याप पॅनलची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे कोणता गट सर्वप्रथम आपले पॅनल जाहीर करतो, याची प्रतीक्षा इतर गटांकडून केली जात असल्याचे चित्र आहे. त्यानुसार प्रतिस्पर्धी गटांकडून तोडीस तोड उमेदवार देण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. आतापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेत शेवटच्या टप्प्यापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज शिल्लक राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. 514 पैकी 511 उमेदवारांचे अर्ज अद्याप कायम असून, उद्याच्या अंतिम दिवशी किती उमेदवार माघार घेतात आणि कोणते पॅनल अंतिम स्वरूपात मैदानात उतरतात, याकडे सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे.
अजितदादांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं…