जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना मारण्याची सुपारी दिली की नाही या प्रकरणी आरोपी, आपली आणि जरांगे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. त्यावर मनोज जरांगे यांनी आपल्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून जालना पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आणि आपण नार्को टेस्टसाठी तयार असल्याचे सांगितले. या प्रकरणातील सर्वांची नार्को टेस्ट आजच करा अशी मागणी त्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.
अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांच्यासह मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी जालना पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. मनोज जरांगे हे नार्को टेस्टसाठी तयार असून या प्रकरणातील सर्वांचीच नार्को टेस्ट करा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या हत्येची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही याला उत्तर देत हे आरोप फेटाळले होते. त्यावर पुन्हा मनोज जरांगे यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली.
मनोज जरांगे यांनी सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची ऑडिओ क्लिप ऐकवली. नंतर त्यांनी धनंजय मुंडे आणि आणखी एका आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली. आपण सीबीआय चौकशीसाठी तसेच नार्को टेस्टसाठी पहिला अर्ज करणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यानुसार आता त्यांनी तसा अर्जही केला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी गोंदी पोलिसांनी गेवराईतून अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोघांना अटक केली. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोन आरोपींपैकी अमोल खुणे हा मनोज जरांगे यांचा समर्थक असल्याचे सांगितले जातं आहे. खुणे कुटुंबीयांनी जरांगेंनी केलेले आरोप फेटाळत, दारुच्या नशेत त्याच्या तोंडून हे बोलून घेतल्याचा दावा केला. मनोज जरांगे यांचे स्टेटस ठेवणाऱ्या माझ्या पतीला अडकवलं जात असल्याचाही आरोप अमोल खुणेच्या पत्नीने केला आहे.
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप…
मनोज जरांगे यांचा मोठा गौप्यस्फोट; धनंजय मुंडेंकडून हत्येचा कट…