शिरुर (तेजस फडके) रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परिषद गटात सध्या थंडीच्या दिवसात राजकीय मात्र गरम झाले असुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत सोनेसांगवी गावच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या विद्यमान संचालक गंगुबाई शेळके तसेच त्यांचे पती माजी उपसरपंच हनुमंत शेळके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
शिरुर खरेदीविक्री संघांचे माजी संचालक तसेच सोनेसांगवी गावचे माजी सरपंच दत्तात्रय कदम यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण हनुमंत शेळके तसेच त्यांच्या पत्नी गंगुबाई शेळके हे दोघेही दत्तात्रय कदम तसेच मानसिंग पाचुंदकर यांचे कट्टर समर्थक होते. तसेच आठ दिवसांपुर्वी मानसिंग पाचुंदकर यांच्या सोबत हे दांपत्य राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात उपस्थित होते.
परंतु गावातील काही अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम करत रांजणगाव गणपती येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परिषद गटातुन भाजपाकडुन इच्छुक असलेल्या उमेदवार स्वाती पाचुंदकर यांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच शेवटपर्यंत शिवसेनेत राहणार असल्याचेही सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास दरेकर, पुणे जिल्हा युवासेनेचे अध्यक्ष बापुसाहेब शिंदे, आंबेगाव-शिरुरचे तालुकाध्यक्ष मल्हारी काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सोनेसांगवी गावचे चार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लवकरच शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश करणार असल्याचे यावेळी मल्हारी काळे यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात सध्या चर्चा सुरु आहे.