सरकार २०० स्टार्टअप्स आणि कंपन्यांना प्रोत्साहन देणार; सेमिकॉन इंडियामध्ये अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

Share

नवी दिल्लीः देशाच्या सेमीकंडक्टर मिशनचा पुढील टप्पा असलेल्या ‘सेमीकॉन २.०’ अंतर्गत सरकार भारतात चिप्स डिझाइन करणाऱ्या किमान २०० स्टार्टअप्स आणि कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सेमिकॉन इंडिया २०२६ मध्ये बोलताना सांगितले.

सेमीकॉन इंडिया २०२६ च्या उद्घाटनाच्या सत्रात वैष्णव म्हणाले, की सेमीकॉन २.० च्या सहा स्तंभांपैकी चिप डिझाइन हा पहिला स्तंभ असेल. मिशनच्या यापूर्वीच्या टप्प्यात १०५ हून अधिक स्टार्टअप्सनी चिप डिझाइन क्षेत्रात प्रवेश केला होता, त्यापैकी सुमारे २० स्टार्टअप्सना अंदाजे ८०० कोटी रुपयांचे व्हेंचर कॅपिटल मिळाले होते, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ते पुढे म्हणाले, गी ही तर केवळ सुरवात होती. यावेळी सरकारचे ध्येय खूप मोठे आहे. आता आपल्याला या पायावर इमारत उभी करायची आहे.

सेमिकंडक्टरची गरज भागवण्यासाठी भारतात चिप्स डिझाइन करणाऱ्या किमान २०० स्टार्टअप्स आणि कंपन्यांना आम्ही प्रोत्साहन देऊ. ते म्हणाले की, देशाने गेल्या काही वर्षांत ‘सेमिकॉन १.०’ च्या माध्यमातून देशांतर्गत सेमिकंडक्टर उद्योगाचा पाया घातला आहे.

मिशनच्या पुढील टप्प्याची रूपरेषा सांगताना वैष्णव म्हणाले, की चिप डिझाइन, यंत्रसामग्री आणि साहित्य, चिप उत्पादन प्रकल्प, प्रगत पॅकेजिंग, संशोधन आणि विकास, आणि प्रतिभा हे त्याचे सहा आधारस्तंभ आहेत. या परिषदेत २८ हून अधिक देश सहभागी होत आहेत. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी दिलेल्या एका शिकवणीची आठवण करून देताना वैष्णव म्हणाले, की नजीकच्या काळाचा विचार करू नका, दूरगामी विचार करा. केवळ उत्पादन प्रकल्पाचा (फॅब) विचार करू नका, संपूर्ण परिसंस्थेचा विचार करा.

ते म्हणाले की, याच विचाराने मोहिमेची रचना सातत्याने मार्गदर्शन करत आहे. सेमिकंडक्टर २.० अंतर्गत, भारतातील आगामी सेमिकंडक्टर कारखान्यांमध्ये १ लाख कुशल तंत्रज्ञ, क्लीनरूम कामगार आणि उत्पादन कामगारांना थेट रोजगारासाठी तयार करण्याचे अतिरिक्त उद्दिष्ट सरकार ठेवणार आहे. यामुळे जागतिक स्तरावर प्रतिभावान मनुष्यबळाचा साठा निर्माण होईल.

‘सेमिकॉन मिशन’ला एक दीर्घ प्रवास संबोधताना वैष्णव म्हणाले. की आतापर्यंत घातलेला पाया २०४७ पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र, किंवा ‘विकसित भारत’ बनवण्याच्या ध्येयाच्या दिशेने प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. ‘सिलिकॉन टू सिस्टिम्स: बिल्डिंग द इकोसिस्टम’, या संकल्पनेवर आधारित सेमिकॉन इंडिया २०२६ चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नवी दिल्लीत केले.

भारत सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये ७६,००० कोटी रुपयांच्या खर्चासह सेमीकॉन १.० ला मंजुरी दिली होती. त्याअंतर्गत, १.६४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त एकूण गुंतवणुकीसह १२ सेमिकंडक्टर उत्पादन युनिट्सना मंजुरी देण्यात आली. भारताने जुलै २०२६ मध्ये १,२७,५०० कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह सेमिकॉन २.० ला मंजुरी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!