अखेर विशाखा राऊतांचे पद रद्द, मुंबईत ७९ नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान; सर्वाधिक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे…

Share

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेतील यंदा पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत महापौर आपल्या पक्षाचा बसवला आहे. तर, ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिकेतील गेल्या २५ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आली आहे. महापालिकेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती असून, विरोधी पक्षात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आहे. मात्र, आता नगरसेवकांच्या निवडीलाच आव्हान देण्यात येत असून ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आलं. तसेच, आता मुंबई महापालिकेतील ७९ नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आतापर्यंत पाच नगरसेवकांची पदे रद्द झाली आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना खोटे आणि चुकीचे जात प्रमाणपत्र दाखल करणे, संपत्तीची माहिती लपवणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवणे अशा प्रकारचा आरोप, जिंकून आलेल्या काही नगरसेवकांवर आहे. त्यामुळे, संबंधित उमेदवारांच्या विरोधात त्यांच्याविरुद्ध लढलेल्या उमेदवारांनी याचिका दाखल करत नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली आहे.

याचिकेद्वारे न्यायालयात आव्हान देण्यात आलेल्यांपैकी सर्वाधिक २२ नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत. त्याशिवाय भाजपचे १६ तर शिंदेंच्या शिवसेनेचे ७ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे १० नगरसेवक, एमआयएमचे ३ आणि मनसेच्या २ नगरसेवक आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका निवडणुकीत आव्हान देण्यात आलेल्या निवडणूक याचिकांची सविस्तर माहिती मुंबई महानगरपालिकेकडे मागविली होती. या निवडणूक याचिकांमुळे मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी न्यायालयीन सुनावण्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, सगळ्यात मोठा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार आहे. कारण, अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!