ठाणेः देशाचा जीडीपी, बेरोजगारी, धर्मांधता, मराठी-हिंदी वाद अशा विविध मुद्द्यांवरुन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी येथे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ठाण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. त्यांच्या या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा चालू झाली आहे.
या सभेतील एका प्रसंगामुळे त्यांची आगामी राजकीय दिशा कोणती असेल, हे स्पष्ट झाले आहे. भाषण संपल्यानंतर राज ठाकरे स्टेजवरुन खाली उतरत होते. त्याचवेळी समोरुन मनसेचे काही कार्यकर्ते घोषणा देत होते. त्यातली एक घोषणा ऐकून राज ठाकरे गर्रकन मागे वळून पुन्हा माईकच्या दिशेने निघाले. काहीवेळ मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांना नेमके काय झाले, हेच समजत नव्हते. आपल्या तोंडातून काही अपशब्द बाहेर पडला की काय आणि आता राज ठाकरे माईकवरुन सर्वांदेखत कानउघडणी करणार की काय, अशी भीती काहींना वाटली.
राज ठाकरे यांनी पुन्हा माईकचा ताबा घेतल्यानंतर त्यांच्या नेहमीच्या करड्या आणि रोखठोक आवाजाच कार्यकर्त्यांकडे पाहून विचारले की, ‘इन्कलाब जिंदाबाद’ कोणी म्हटले? त्यावर साहजिकच समोरुन लगेच उत्तर आले नाही. तेव्हा राज ठाकरे म्हणाले की, यापुढे ‘इन्कलाब जिंदाबाद’ हीच घोषणा द्यायची. ही भगतसिंगांची घोषणा आहे. एवढे सांगून निघून गेले.
हा प्रसंग अनेकांच्या मनात कोरला गेला. राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात, ‘देवावर श्रद्धा असू द्या, धर्माचा अभिमान असावा, पण धर्मांध होऊ नका’, हा सल्ला आवर्जून दिला. भाजपकडून गेल्या काही काळात सातत्याने राष्ट्रीयत्त्वाच्या आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भर देत राजकारण केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच संसदेत ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीतासंदर्भात महत्त्वाचा कायदा मंजूर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अत्यंत लोकप्रिय घोषणा ठरलेल्या ‘इन्कलाब जिंदाबाद’चे महत्त्व मनसेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिले. ‘वंदे मातरम’ इतकेच ‘इन्कलाब जिंदाबाद’ महत्त्वाचे आहे, असे सांगितले. त्यामुळे या प्रसंगाची सध्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरु आहे.