हैदराबाद जीआरनंतर एकही मराठा वंचित राहणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते – जरांगे पाटील

Share

जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज १० वा दिवस आहे. राज्य सरकारने अद्याप त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य न केल्याने उपोषण चालूच आहे. माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य बनविले. हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यानंतर फडणविसांचा फोन आला होता. या जीआरनुसार एकही मराठा वंचित राहू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले होते, असे जरांगे म्हणाले.

सरकार जाणूनबुजून दिरंगाई आणि हलगर्जीपणा करत आहे. मराठ्यांचा रोष वाढतो आहे. मराठा संपवण्याचा हा प्रयत्न आहे. आपण सरकारला १२ तारखेपर्यंतचा वेळ दिला आहे. उपोषणाची वेळ येणार नाही, असे अनेक मंत्र्यांनी आपल्याला सांगितले होते. मुख्यमंत्री फडणवीस मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करतील, असे प्रसाद लाड यांनी सांगितले होते. तथापि, गेल्या एक वर्षात त्यांनी काही केले नाही, असे जरांगे म्हणाले.

फडणवीसांवर आम्ही विश्वास ठेवला. फक्त सातारा, कोल्हापूरमध्ये दोन महिने थांबण्याची त्यांनी विनंती केली होती. ते फक्त गोड बोलतात. एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे, महाजनांचे घर त्यांनी पायाखाली घातले. निलंगेकरांचे घर पायाखाली, तावडेचे घर पायाखाली, गडकरीचे घर पायाखाली घेतली आहेत. आपण शेकडो उदाहरणे देऊ शकतो, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

नारायण राणे, अशोक चव्हाण, विखे पाटलांचे घर पायाखाली घातले. राजगादीचे सगळे राजे चिडीचुप बसले आहेत. कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गादीवर एवढी वाईट वेळ येऊ नये, असे म्हणत राजेंनाही जरांगे पाटलांनी लक्ष्य केलं. एकनाथ शिंदे म्हणायला मला आता लाज वाटते. त्यांनी मराठ्यांचा तळतळाट घेतला. तो आपला नाही, अशी बोचरी टीका जरांगेंनी एकनाथ शिंदेंवर केली.

राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला फडणवीस जबाबदार असतील, हे मोदी आणि अमित शहा यांनी लक्षात ठेवावे. एकदा लाट उसळली तर दिल्लीकडे जाऊ शकतो, मग सगळे बंगाल, पंजाब, सगळीकडे जाऊ. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी फडणवीसांना समजावून सांगावे. देवेंद्र फडणवीसांमुळे आंदोलन चिघळू शकते. सव्वातीन कोटी मराठा मुंबईत येऊ शकतात. यावेळी आंदोलकांनी स्व-संरक्षासाठी झाडू ठेवावा, आजपासून कामाला लागा, सर्वांनी १२ तारखेला अंतरवालीमध्ये यायचे आहे, असे आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना, मंत्री उदय सामंत चंद्रपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की विखे पाटील यांनी आत्ताच ऑनलाईन बैठक घेतली आहे. सगळे अधिकारी त्यात होते. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न चालू आहे. जरांगे पाटील यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, प्रश्न सुटतच राहणार आहेत, पण आपली प्रकृती, आपला जीव महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने त्यांनी आंदोलन स्थगित करावे. दरम्यान, ओबीसी समाजाचे आरक्षण कुठल्याही प्रकारे कमी होणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!