चेन्नईः महिलांवर करण्यात येणाऱ्या आक्षेपार्ह आणि अश्लील टिप्पण्यांबाबत, तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि ‘तमिळगा वेत्री कझगम’ (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी विधानसभेत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. आपली निकटवर्तीय मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्यावर विरोधी नेत्यांकडून करण्यात आलेल्या टिप्पणीचा स्पष्ट उल्लेख करून त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.
आपल्या राजकीय विजयात महिलांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यामुळे महिलांच्या विरोधात कोणतीही आक्षेपार्ह भाषा आपण अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. राजकारणात राजकीय टीका-टिप्पणी ही तीव्र असू शकते, परंतु महिलांचा सन्मान राखलाच पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
तमिळनाडूतील कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका करताना द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्याबाबत अश्लील आणि विवादित वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात तीव्र आंदोलने केली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी टीव्हीके कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते, मात्र मद्रास उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
दुसरीकडे, अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्याबाबत सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या, प्रवीण गणेश या उद्योजकाला चेन्नई सायबर क्राइम पोलिसांनी अटक केली आहे. हाँगकाँगवरून भारतात येत असताना दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लुकआऊट नोटीसच्या आधारे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. प्रवीणने जून महिन्यात ‘एक्स’ वर पोस्ट केली होती. ही पोस्ट काढून टाकली असली, तरी सायबर गुन्हे शाखेने त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे.
अभिनेत्री त्रिशा कृष्णन ही मुख्यमंत्री विजय यांची अत्यंत जवळची मैत्रीण मानली जाते. विजय यांच्या राजकीय प्रवासात आणि प्रमुख कार्यक्रमांमध्ये ती अनेकदा दिसून आली आहे. मुख्यमंत्री म्हणून विजय यांच्या शपथग्रहण सोहळ्यात, तसेच नुकत्याच पार पडलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय कार्यक्रमात तृषा पहिल्या रांगेत उपस्थित होती.