सोलापूर: सोलापूर महापालिकेत ८७ जागा जिंकून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षात आता महापौरपदावरून अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नगरसेवकांना महापौरपदाबाबत कोणतीही चर्चा अथवा माध्यमांशी वक्तव्य करू नका, अशी स्पष्ट तंबी दिली असतानाच, आमदार विजयकुमार देशमुख गटाच्या नगरसेवकांची स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीत आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉ. किरण देशमुख यांच्या नावाची महापौरपदासाठी शिफारस करण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर अवघ्याच काही वेळात देशमुख यांच्या कार्यालयात नगरसेवकांची बैठक झाल्याने भाजपमधील गटबाजी उघड झाली आहे.
सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले असून, आता महापौर, स्थायी समिती सभापती आणि गटनेता या महत्त्वाच्या पदांसाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपमध्ये आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे असे तीन प्रमुख गट सक्रिय आहेत. या तिन्ही गटांमध्ये पदांवरून चुरस पाहायला मिळत आहे.
दरम्यान, देशमुख गटाकडून मात्र अशी कोणतीही स्वतंत्र बैठक झाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार कार्यक्रमासाठी नगरसेवक एकत्र आले होते, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
तथापि, देशमुख गटाच्या बैठकीची चर्चा माध्यमांमध्ये येताच सुरू झालेल्या स्पष्टीकरणांमुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. महापौरपदाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार, याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागले असून भाजपमधील शह-कटशहाचे राजकारण अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.