मुंबईः पुण्यातील शासकीय तंत्र महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो अमित ठाकरे यांनी काढायला लावल्याच्या निषेधार्थ, मंगळवारी भाजप युवा मोर्चातर्फे मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे. भाजयुमोचे कार्यकर्ते हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ, या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. थोड्याच वेळात मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने शिवाजी पार्कला वेढा घातला. भाजपच्या कार्यकर्त्यांना मनसेच्या पद्धतीने उत्तर मिळेल, असा पवित्रा घेतला.
मनसेचे संदीप देशपांडे, अविनाश जाधव, गजानन काळे यांच्यासह मुंबई आणि नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या घराबाहेर सज्जतेने उभे होते. मात्र, बराचवेळ उलटूनही भाजयुमोचे कार्यकर्ते आलेच नाहीत. आम्हाला जागा सांगावी, आम्ही तिकडे येऊ, असे संदीप देशपांडे म्हणाले.
मनसे कार्यकर्त्यांची इतकी मोठी फौज शिवाजी पार्कच्या परिसरात उभी असल्याने कृष्णराज महाडिक आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कची वेसही ओलांडता आली नाही. कृष्णराज महाडिक हे भाजयुमो कार्यकर्त्यांसह माहीम आणि माटुंग्यातून राज ठाकरे यांच्या घराकडे येणार होते. मात्र, मनसे आणि भाजयुमोचे कार्यकर्ते भिडण्याची शक्यता लक्षात घेऊन, पोलिसांनी दादर आणि माहीम दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कृष्णराज महाडिक यांनी पोलिसांचा डोळा चुकवून माहीम येथून शिवतीर्थाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अमित ठाकरेने तमाशा केला, त्याचा विरोध म्हणून आम्ही येथे आलो आहोत. पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती यांचे फोटो प्रोटोकॉलप्रमाणे लावणे बंधनकारक असते, असे त्यांनी सांगितले.
कृष्णराज महाडिक आणि भाजयुमोचे कार्यकर्ते माटुंगा आणि माहीम परिसरात असल्याचे समजताच मनसेच्या काही नेत्यांनी तुकड्या करुन उलट भाजयुमोला गाठण्यासाठी माहीम आणि माटुंगा परिसर गाठला. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना एकमेकांना भिडू दिले नाही. मनसेचे गजानन काळे आणि इतर काही कार्यकर्ते बेधडकपणे भाजयुमोचे कार्यकर्ते असलेल्या माटुंगा परिसरात शिरले. मात्र, पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. संदीप देशपांडे, अविनाश जाधव हे दोघेही राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर आहेत. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची इतकी मोठी फौज तैनात असल्याने, भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांचे घर सोडाच पण शिवाजी पार्कची वेसही ओलांडता आली नाही.