पुणे महापालिका निवडणूक! आघाडीतील वाद उफाळले, वसंत मोरे–प्रशांत जगताप यांच्यात आरोप-प्रत्यारोप

Share

पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर आघाडीतील राजकीय वाद उफाळले आहेत. पक्षाचे काही प्रमुख उमेदवार पराभूत झाल्याने नाराजीचे सूर उमटले आहेत, तर निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीतील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

शिवसेना (उबाठा) पक्षाचे निवडणूक प्रमुख वसंत मोरे यांनी प्रभाग क्रमांक 38 मधून निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपचे उमेदवार व्यंकोजी खोपडे यांनी सुमारे 1,100 मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर मोरे यांनी थेट काँग्रेसवर, विशेषतः काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.मोरे यांनी मतदान प्रक्रियेबाबतही संशय व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मतदानानंतर जाहीर करण्यात आलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणीदरम्यान मतांमध्ये तफावत आढळली.

मोरे यांचा आरोप आहे की प्रशांत जगताप यांनी भाजपशी संगनमत करून त्यांचा पराभव घडवून आणला. त्यांच्या मते, प्रभागात काँग्रेससाठी एक जागा निश्चित असताना, जगताप यांनी पाच काँग्रेस उमेदवार उभे केले. आघाडी असताना असे का करण्यात आले, याबाबत त्यांनी वारंवार तक्रार केली, परंतु दखल घेण्यात आलेली नाही, असा दावा मोरे यांनी केला.

दरम्यान, प्रशांत जगताप यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले, “वसंत मोरे हे सोशल मीडियावर सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेले लोकप्रिय नेते आहेत. अशा नेत्याचा पराभव भाजपच्या नवख्या कार्यकर्त्याने केला, यावर त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे.” तसेच, “मी किंवा काँग्रेसने वसंत मोरे यांच्या विरोधात कोणताही उमेदवार दिलेला नाही,” असा खुलासाही त्यांनी केला.पुणे महापालिका निवडणुकीनंतर उफाळलेला हा वाद महाविकास आघाडीतील समन्वय आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवर कसा परिणाम करतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *