ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पु्र्णेकर यांची मंगळवारी (ता. २९) रात्री त्यांच्या कार्यालयातच हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर ठाण्यात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळा खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या हत्येच्या कटात असलेल्या पप्या शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी पप्या शिंदे हा प्रदीप पूर्णेकर यांचा मित्र असून हल्ला होत असताना त्यांच्या ऑफिसमध्ये बसला होता.
प्रदीप पु्र्णेकर यांच्या हत्येनंतर परिसरात तणावपूर्ण स्थिती आहे. मानपाडा परिसरातील मनोरमानगर येथील ऑफिसमध्ये घुसून पूर्णेकरांवर हल्ला केला. आरोपींनी सहा ते सात राऊंड फायरींग केले. पूर्णेकरांचा जीव गेलाय याची खात्री करण्यासाठी त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
View this post on Instagram
प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी धक्कादायक माहिती दिली. राम पूर्णेकर यांनी एका वृत्तवाहिनीसोबत सांगितले की, “हल्ला झाला त्या वेळी पप्या शिंदे स्वतः ऑफिसमध्येच बसलेला होता. अवघ्या दोन दिवसांपूर्वीही तो ऑफिसमध्ये आला होता आणि माझ्या वडिलांशी तास-दीड तास गप्पा मारत बसला होता. मात्र, त्या दिवशी ऑफिसमध्ये इतरही अनेक लोक उपस्थित होते. घटनेवेळी सर्वजण गणेशोत्सवाची वर्गणी जमा करण्यासाठी बाहेर पडले होते. त्यामुळे ऑफिसमध्ये वडिलांशिवाय कोणीही नव्हते. गोळी लागल्यानंतर मीच प्रदीप पूर्णेकरांना पकडले, असा दावा पप्या शिंदे करत होता. मात्र, प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी पप्यावर एकही वार झाला नाही किंवा त्याला साधं खरचटलं देखील नाही” असा थेट सवाल राम पूर्णेकर यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “हल्ल्यानंतर पप्या शिंदे थेट रुग्णालयातही आला होता आणि तिथे कनोजिया नावाच्या व्यक्तीला सतत शिव्या देत होता. परंतु, तपासादरम्यान पोलिसांनी संशयित म्हणून त्यालाच ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, पप्या शिंदे हा माझ्या वडिलांचा जुना मित्र होता. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी पप्पा शिंदे याला अटक केली आहे. या प्रकरणी आता पप्या शिंदेची चौकशी सुरू आहे. तर, इतर फरार आरोपींच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी चारपैकी एका आरोपीला अटक केली आहे. राजकीय आणि सामाजिक कारणावरून वाद झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी इतर फरार आरोपींना पकडण्यासाठी क्राइम ब्रांचसह 9 ते 10 टीम रवाना करण्यात आल्या आहेत, लवकरच उर्वरीत आरोपी पकडले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.