युपी, बिहारच्या निवडणुकांवर डोळा ठेवून आंदोलन – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Share

मुंबई: ‘उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, काही राजकीय नेते मुंबई आणि ठाण्यातील वातावरण खराब करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत’, असा खळबळजनक आरोप राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी येथे केला. महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादावर ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. कोणत्याही चालकाला आतापर्यंत ५०० रुपयांचाही दंड ठोठावण्यात आलेला नसताना, २० ते २५ हजार रुपयांचा मोठा दंड आकारला जात असल्याच्या अफवा पसरवून, समाजात हिंदी विरुद्ध मराठी असा अनावश्यक विवाद निर्माण केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषेच्या ज्ञानाबाबतच्या नियमांवरून रिक्षाचालकांमध्ये पसरलेल्या भीतीमुळे मुंबईतील काही भागांत निदर्शने झाली होती. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी परिस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले, की उत्तर भारतीय नेते संजय निरुपम, आमदार अबू आझमी तसेच युनियन नेते शशांक राव यांनी या विषयावर चर्चा केली आहे. आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा रिक्षा-टॅक्सी युनियनने चालकांसाठी मराठीचे व्यवहारज्ञान सक्तीचे करण्याच्या निर्णयाला विरोध केलेला नाही. मात्र, उत्तर भारतातील निवडणुकांचा फायदा उठवण्यासाठी काही नेते रेल्वेतून रिक्षा उत्तर भारतात पाठवत असल्याचे बनावट व्हिडिओ आणि गाणी समाजमाध्यमांवर प्रसारित करून गैरसमज पसरवत आहेत.

चालकांना दिलासा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले आहे की, या निर्णयाचा उद्देश चालकांना भाषेचे तज्ज्ञ बनवणे नसून, प्रवाशांशी दैनंदिन संवाद साधता यावा इतकाच आहे. चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला असून, एका महिन्याची नोटीस देऊन त्यांना भाषेचे ज्ञान आत्मसात करण्याची संधी दिली जाईल. या कालावधीत अयशस्वी ठरल्यास परवाना निलंबित करून पुढील तीन महिने दिले जातील. मुदत संपण्यापूर्वी दंड आकारणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *