मुंबईतील रेल्वे स्थानक परिसर विकासाचे लक्ष्य – आयुक्त अश्विनी भिडे

Share

मुंबई: मुंबईतील पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘पादचारी प्रथम’ अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत आता रेल्वे स्थानक परिसराच्या विकासासाठी धोरण निश्चित करण्याचे निर्देश, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात पदपथांसोबतच रस्ते वाहतुकीच्या विषयांची अंमलबजावणी सूक्ष्म आणि नियोजनबद्ध पद्धतीने करणे शक्य होईल.

अति गर्दीच्या वेळेत नागरिकांना स्थानक परिसरातून चालणे आणि वाहतुकीचे पर्याय उपलब्ध होण्यासाठी या नियोजनाचा फायदा होईल त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश भिडे यांनी दिले. दरम्यान, पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडूप, कांजुरमार्ग या रेल्वे स्थानक परिसराला त्यांनी भेट देऊन पाहणी केली.

सुगम्य पदपथ धोरणांतर्गत मुंबईत ‘पादचारी प्रथम’अभियान राबविण्यात येत आहे. रेल्वे स्थानकांच्या आजूबाजूच्या परिसराचा स्वतंत्रपणे विकास करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर धोरण तयार करावे, अशी सूचनाही आयुक्तांनी केली. त्यामुळे स्थानक परिसरातील पदपथ, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची ये-जा यांचे अधिक प्रभावी नियोजन करता येणार आहे. सुमारे तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. ‘टी’ विभागातील मुलुंडमध्ये १३ मार्ग ‘पादचारी प्रथम’ अभियानासाठी निवडण्यात आले असून, या मार्गांवरील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात नोकरदार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ये-जा होते. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

भांडूप रेल्वे स्थानक पश्चिम परिसरात ‘बेस्ट’ बसची नियमित वाहतूक आणि रस्ते वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. स्थानक परिसरातील ९४ गाळेधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यानंतर पदपथ मोकळा करून नागरिकांना स्थानकापर्यंत अडथळामुक्तपणे जाता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

नागरिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता योग्य ठिकाणी द्यावा आणि घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले. कचरा टाकण्याच्या ठिकाणी नियमित दंडात्मक कारवाई, सीसीटीव्हीद्वारे निगराणी आणि कचरा संकलन वाहनांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *