सोनिया गांधींचे ‘बिलाँगिंग’ पुस्तक छापण्यास पेंग्विन प्रकाशनाचा नकार

Share

नवी दिल्लीः काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या आगामी ‘बिलाँगिंग, अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकावरून सध्या मोठा राजकीय आणि साहित्यिक वाद निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुस्तकातील काही संवेदनशील मुद्द्यांवरून लेखिका सोनिया गांधी आणि प्रसिद्ध प्रकाशन संस्था ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ यांच्यात एकमत होऊ शकले नाही. प्रकाशकाने हस्तलिखितातील काही भाग हटवण्याचा किंवा बदलण्याचा सल्ला दिला होता, परंतु सोनिया गांधींनी त्यास ठाम नकार दिला. त्यानंतर ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने भारतात हे पुस्तक प्रकाशित करण्यास असमर्थता दर्शवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे पुस्तक १० नोव्हेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनुसार, ज्या भागांवर पेंग्विन इंडियाने आक्षेप घेतला होता, त्यामध्ये तीन महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळावर करण्यात आलेली भाष्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित काही मुद्दे आणि वक्तव्ये आणि चीनने भारतीय सीमेवर केलेल्या कथित अतिक्रमणाशी संबंधित मजकूर, या तीन मुद्द्यांवरून प्रकाशक आणि सोनिया गांधी यांच्यात मदभेद असल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे, ‘पेंग्विन वर्ल्डवाइड’ला या मजकुरावर कोणतीही अडचण नव्हती, परंतु पेंग्विन इंडियाने भारतीय कायदेशीर आणि राजकीय परिस्थितीचा विचार करून त्यावर आक्षेप घेतला होता. सोनिया गांधी यांनी या तीनही विषयांवरील मजकूर हटवण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.

या वादाच्या पार्श्वभूमीवर पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने अधिकृत निवेदन जारी करून आपले स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने म्हटले, की ‘आम्ही या पुस्तकाचे भारतातील प्रकाशक नाही. सोनिया गांधींनी संपादकीय बदल स्वीकारले नाहीत म्हणून आम्ही पुस्तक नाकारले, असा दावा करणे चुकीचे आहे. एका जबाबदार प्रकाशकाच्या नात्याने पुस्तकातील तथ्यांची पडताळणी करणे आणि लेखकाला योग्य ते मार्गदर्शक बदल सूचवणे हा आमचा हक्क आणि कर्तव्य दोन्ही आहे.’

सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान आम्ही ‘बिलाँगिंग’ हे पुस्तक प्रकाशित करण्यास उत्सुक आणि तयार होतो. लेखकासोबतच्या गोपनीय चर्चेवर यापेक्षा जास्त भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही कंपनीने म्हटले आहे.

भारतात पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने या प्रकल्पातून माघार घेतली असली, तरी परदेशात या पुस्तकाच्या प्रकाशनाची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. अमेरिकेत पेंग्विन रँडम हाऊसचाच भाग असणारे प्रसिद्ध ‘अल्फ्रेड ए. नॉफ’ हे प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *