बंगळुरू: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान किंवा राज्यपालांच्या उपस्थितीत होणारे कार्यक्रम वगळता, कोणत्याही शासनातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची केवळ पहिली दोनच कडवी म्हणण्यात यावीत, असा आदेश कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी जारी केला आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये या विषयावर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रगीत ‘जन गण मन’ म्हणण्यापूर्वी ‘वंदे मातरम’ची सर्व सहा कडवी गायली जावीत, असे केंद्र सरकारने वंदे मातरम गीताचा १५० वा दिन साजरा करत असताना गेल्या जानेवारीमध्ये हा निर्देश जारी केला होता. मात्र, काँग्रेस कार्यकारिणी समितीने १९ ऑगस्ट रोजी आपल्या १९३७ च्या ठरावावर ठाम राहण्याचा निर्णय घेऊन, पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये केवळ दोन कडवी गायली जातील, असे स्पष्ट केले होते.
काँग्रेस नेत्यांनी वंदे मातरमची सर्व कडवी न गाण्याचा निर्णय घेऊन, गीताचा अपमान केला आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केल्यानंतर, हा निर्णय घेण्यात आला. या आदेशाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, भारतीय राष्ट्रीय चळवळीदरम्यान राष्ट्रवाद, एकता आणि देशभक्ती वाढविण्यात वंदे मातरमने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. गृह मंत्रालयाने राष्ट्रगीताच्या अधिकृत आवृत्तीवर आणि सरकारी व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते गाण्याच्या किंवा वाजवण्याच्या नियमावलीवर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, त्यात सामूहिक गायनाचे प्रसंगही निर्दिष्ट केले आहेत.