पणजी: मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणारा विलंब ‘लाजिरवाणा’ आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील विलंब व निकृष्ट अंमलबजावणीसाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिले. या प्रकल्पाला इतका विलंब झाल्याची आपल्याला लाज वाटते असे सांगून, गडकरी म्हणाले की ते रुंदीकृत मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार नाहीत.
गडकरी पुढे म्हणाले की, येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबई ते गोवा रस्त्याने प्रवास करून आपण महामार्गाची वैयक्तिक पाहणी करणार आहोत. प्रवाशांसाठी प्रवास सुखकर होतो की नाही, याचे मूल्यांकन करणार आहोत.
मुंबई-गोवा महामार्गाबाबत अधिकाऱ्यांची आपण बैठक घेतली होती. पायाभूत सुविधा प्रकल्पांना होणाऱ्या विलंबासाठी आणि निकृष्ट अंमलबजावणीसाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन देऊन गडकरी म्हणाले, की आता एक वर्षाच्या आत या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई करण्याचा, तसेच अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा विक्रम प्रस्थापित करण्याचा आपला निश्चय आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील कोकण भागातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला वारंवार विलंब झाला आहे. हा महामार्ग आता सुमारे ९३ ते ९४ टक्के पूर्ण झाला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पणजीजवळील पर्वरी येथे सहा पदरी उन्नत कॉरिडॉरचे उद्घाटन केल्यानंतर गडकरी बोलत होते.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील ६४१ कोटी रुपये खर्चाच्या, ५.१५ किमी लांबीच्या उन्नत मार्गामुळे प्रवासाचा वेळ सुमारे ३० ते ४० मिनिटांनी कमी होईल आणि तीन प्रमुख चौकांमधील वाहतूक कोंडीही कमी होण्यास मदत होईल, असे सांगून नवीन कॉरिडॉरबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की, मूळच्या दोन पदरी रस्त्याची क्षमता आता १० पदरी झाली असून, त्यात खाली चार पदरी आणि वर सहा पदरी आहेत. या कॉरिडॉरमुळे पणजी, पर्वरी, म्हापसा आणि उत्तर गोवा यांच्यातील संपर्क अधिक सुसह्य होईल.
मुंबई-गोवा महामार्गालगत राज्याची वास्तुकला, खाद्यसंस्कृती आणि हस्तकला परंपरा दर्शविणाऱ्या रस्त्यालगतच्या सुविधा विकसित करण्याचे आवाहन, गडकरी यांनी गोवा सरकारला केले. ते म्हणाले की, अशा सुविधांनी गोव्याचे खाद्यसंस्कृती, हातमाग आणि हस्तकला उत्पादने प्रदर्शित केली पाहिजेत आणि राज्यातून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव दिला पाहिजे.
गडकरींनी मार्गावरील पेट्रोल आणि डिझेल पंपांवर जैवइंधन, इलेक्ट्रिक वाहने आणि इतर पर्यायी इंधनांसाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. कंत्राटदारांना मनमानी वृक्षारोपण करण्याऐवजी महामार्गालगत शास्त्रीय पद्धतीने वृक्षारोपण करण्याचे आणि राज्य सरकारला संपूर्ण महामार्ग ‘हरित महामार्ग’ बनवण्याचे आवाहन केले. ‘ऑक्सिजन पार्क’च्या धर्तीवर त्याचा विकास करण्याची सूचना केली.
गडकरी यांनी गोव्याला जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणापासून मुक्त करण्याच्या गरजेवरही भर दिला आणि समुद्रात कचरा जाणार नाही याची खात्री करण्याचे आवाहन प्रशासनाला केले.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्यामध्ये व्यापक वाहतूक अभ्यास आणि सुधारणांची गरज त्यांनी प्रकट केली. बाजारपेठांचे एकत्रीकरण, गोदामे शहराबाहेर हलवणे, बस डेपो सुधारणे आणि वाहतुकीचे सुसूत्रीकरण यांचा समावेश आहे. पर्यायी इंधने आणि इलेक्ट्रिक, हायड्रोजन व फ्लेक्स-फ्यूएल तंत्रज्ञानाचा अधिक वापर केल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.