नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपोदरात २५ बेसिस पॉइंट्सची म्हणजेच ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. समितीमधील सर्वच सदस्य रेपोदरात वाढीसाठी सकारात्मक होते. त्यामुळे आता रेपोरेट ५.५० टक्के झाला आहे. वाढती महागाई, १०० डॉलर्सच्या पुढे गेलेले कच्च्या तेलाचे दर, जागतिक व्याजदरातील वाढ आणि बँकिंग व्यवस्थेतील अतिरिक्त तरलता यामुळे रिझर्व्ह बँकेसमोर व्याजदर वाढवावे लागल्याची माहिती, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली.
यंदाच्या पतधोरण बैठकीत २५ बेसिस पॉइंट्सची वाढ होऊन रेपोदर ५.५० टक्के झाल्याने व्याजदर वाढले आहेत. विशेष म्हणजे पुढील टप्प्यात रेपोदर ५.७५ ते ६ टक्क्यांच्या तटस्थ पातळीच्या दिशेने जाऊ शकतो. हा अंदाज आर्थिक वर्ष २०२८ च्या सुरुवातीपर्यंतच्या कालावधीसाठी आहे.
कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर गेल्याचा परिणाम इंधनाच्या किमती आणि एकूण महागाईवर होऊ शकतो.
जागतिक व्याजदर आणि डॉलरचा दबाव: जागतिक रोखे बाजारातील परतावे वाढले आहेत. त्याचवेळी अमेरिकन डॉलर मजबूत होत आहे. अशा परिस्थितीत भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांकडे येणाऱ्या परदेशी भांडवलाच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो.
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत: व्याजदर वाढीच्या शक्यतेमागे अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती हेही एक कारण आहे. एचएसबीसीच्या १०० प्रमुख आर्थिक वाढीच्या निर्देशकांमध्ये अलीकडच्या महिन्यांत वाढीचा कल दिसत आहे.
महागाई पुन्हा वाढण्याची शक्यता: ऑगस्टमधील ४.८ टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये महागाई सुमारे ५.५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असा एचएसबीसीचा अंदाज आहे. २०२६ च्या चौथ्या तिमाहीत सरासरी महागाई ६ टक्क्यांपेक्षा थोडी अधिक राहू शकते.
परिणाम काय?
रेपोदर वाढल्याने बँकांच्या कर्जदरांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे नवीन कर्ज घेणारे ग्राहक, तसेच बदलत्या व्याजदराशी जोडलेली कर्जे असलेले ग्राहक यांच्यासाठी व्याजखर्च वाढण्याची शक्यता आहे. याचा मासिक हप्त्यांवर होऊ शकतो. मात्र, रेपोदरातील बदलाचा कर्जाच्या व्याजदरावर आणि मासिक हप्त्यावर नेमका परिणाम किती होईल, हे पुढील काही दिवसांमध्ये निश्चत होईल.
किती वाढणार हफ्ता?
रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी वाढल्याने तुमच्या १५ हजार रुपयांच्या चालू मासिक हप्त्यामध्ये अंदाजे २५० ते ३५० रुपयांची वाढ होईल, म्हणजेच साधारणपणे १५,२५० ते १५,३५० रुपयांइतका नवीन हप्ता भरावा लागू शकतो.