…म्हणून एमपीएससी आंदोलन पुण्यातून मुंबईत हलवण्याची तयारी? मुंबईत कुठे जमणार हजारो विद्यार्थी?

Share

पुणेः गेल्या सहा दिवसांपासून चालू असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विद्यार्थ्यांचे आंदोलन आता मुंबईत हलवले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मंगळवारी प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आता हे आंदोलन मुंबईत केले जाण्याची दाट शक्यता आहे. हे आंदोलन पुढील काही दिवसांमध्ये मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचे सांगितले जात आहे.

रोहित पवार यांनी मंगळवारी रात्री आंदोलनातील विद्यार्थ्यांशी यासंदर्भात चर्चा केली. आंदोलनाला सहा दिवस झाले तरी सरकार काही ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळेच आता एमपीएससीच्या मुख्य कार्यालयासमोर जाऊन आंदोलन करण्याबाबत विद्यार्थ्यांसोबत रोहित पवारांनी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यामधील नवी पेठ येथील गरवारे महाविद्यालय तसेच पत्रकार भवनाजवळ असलेल्या एस. एम. जोशी पूल परिसरामध्ये मुख्य आंदोलन चालू आहे. हे आंदोलन २ ऑक्टोबरपासून चालू आहे. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह परीक्षा पद्धती व पारदर्शकतेच्या मागण्या विद्यार्थ्यांकडून केल्या जात आहेत.

एमपीएससीचे मुख्य कार्यालय मुंबईमधील महात्मा गांधी मार्गावरील हुतात्मा चौकातील बँक ऑफ इंडिया बिल्डिंगमधल्या तिसऱ्या मजल्यावर आहे. हे ठिकाण आझाद मैदानापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे आता एपीएससीचे विद्यार्थी खरोखरच आझाद मैदानावर आंदोलन करणार, की हुतात्मा चौकात आंदोलन करणार हे पुढील येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. मात्र या दोन्ही ठिकाणांपैकी कुठेही आंदोलन झाले, तरी याचा मुंबईकरांना फटका बसू शकतो. कारण या ठिकाणी रोज मोठ्या संख्येनं मुंबईकरांची ये-जा चालू असते. हा सर्व परिसर कार्यालयीन इमारती असलेला आहे.

पुण्यात गेल्या आठवड्याभरपासून चालू असलेल्या एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ॲड. अर्णव उरणकर यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे. आंदोलनामुळे पुण्यातील नागरिकांना त्रास होत असल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. आंदोलनस्थळी दररोज हजारो लोक विनापरवानगी जमा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्ते अडवल्यामुळे रुग्णवाहिकांना मार्ग मिळत नसल्याचा आरोप केला गेला आहे. शाळकरी मुलांनाही या मार्गांवरून प्रवास करताना अडचणी होत असल्याचा दावा करण्यात आला असून, या याचिकेवर आज सकाळी ११ वाजल्यानंतर सुनावणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!