इस्लामाबाद: पाकिस्तानच्या ‘जमीयत उलेमा-ए-इस्लाम-फजल’चे (जेयूआय-एफ) प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानच्या लष्करावर जोरदार टीका केली आहे. ‘मौलाना डिझेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फजलुर रहमान यांनी लष्कराचा पाकिस्ताच्या राजकारणातील हस्तक्षेपाला उघडपणे विरोध केला. पाकिस्तानवर कोण राज्य करेल, हे जनता आपल्या मतांद्वारे ठरवेल, असे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानातील मदरशांची संख्या कमी करण्याच्या पाकिस्तानी सरकारच्या योजनेलाही त्यांनी विरोध केला. त्यांनी पाकिस्तानची तुलना भारताशी करत भारताच्या प्रगतीचे आर्थिक उदाहरण दिले.
मौलाना फजलुर रहमान म्हणाले, की पाकिस्तानच्या सीमांचे रक्षण करणे ही लष्कराची जबाबदारी आहे आणि त्यांनी देशाच्या राजकीय घडामोडींमध्ये हस्तक्षेप करू नये. आपण लष्कराच्या विरोधात नाही, तर राजकारणातील लष्कराच्या भूमिकेच्या विरोधात आहे. लष्कराने सीमांचे रक्षक म्हणून राहिले पाहिजे. देश कोण चालविणार याचा निर्णय जनतेच्या मतावर सोडला पाहिजे.
ते पुढे म्हणाले, लष्कराचा एक संस्था म्हणून आपण आदर करतो, पण राजकारणातील त्यांच्या हस्तक्षेपाला आपला विरोध आहे. जर सामान्य नागरिक किंवा राजकीय नेता लष्कराचा गणवेश घालू शकत नसतील, तर लष्करालाही राजकारणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.,
जेयूआय-एफ प्रमुखांनी धार्मिक मदरसे बंद करण्याच्या किंवा धर्मगुरूंना लक्ष्य करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाविरुद्ध इशाराही दिला. कोणीही मदरसे बंद करू शकणार नाहीत किंवा धर्मगुरूंना संपवू शकणार नाहीत, असे मौलाना रहमान म्हणाले. जेयूआय-एफला पारंपरिकरित्या पाकिस्तानच्या धार्मिक मदरशांच्या जाळ्याकडून मोठा राजकीय पाठिंबा मिळत आला आहे, त्यामुळे मदरशांचे नियमन आणि नोंदणी हा पक्षासाठी एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.
फजलुर रहमान म्हणाले, की राष्ट्राध्यक्ष, फील्ड मार्शल आणि ‘एस्टॅब्लिशमेंट’च्या संरक्षणासाठी पाकिस्तानच्या संसदेत संरचना उभारल्या जात आहेत. त्यांच्या मते, ‘एस्टॅब्लिशमेंट’ म्हणजे पाकिस्तानी सैन्य. रहमान यांनी पाकिस्तानच्या बिघडत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीला हाताळण्याच्या सरकारच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
त्यांनी खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमधील हिंसाचार आणि काश्मीरमधील आंदोलनांचा दाखला दिला. ते म्हणाले, की खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान जळत आहेत, तर काश्मीरमधील लोक आंदोलन करत आहेत. सरकार म्हणते की ते आईसारखे आहे; म्हणून आम्ही त्या आईला म्हणतो: आईसारखे वागा. त्यांनी पाकिस्तानच्या सीमांमध्ये आणि देशांतर्गत शांतता राखण्यात लष्कराच्या अपयशावरही खरपूस टीका केली.