पुणे: पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय येथे आईच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. कमला नेहरू रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत बोठे, डॉ. मंदार नागमोडे आणि डॉ. आकाश डोळसे यांच्या टीमने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अत्यंत कौशल्य, समर्पण आणि तत्परतेने उपचार करून रुग्णाला दिलासा दिला. आई शस्त्रक्रियेनंतर चालली… आणि आमचे डोळे पाणावले… कमला नेहरु रुग्णालयातील सेवाभावाचे आणि कार्यतत्परतेचे मनापासून कौतुक. पत्रकार संतोष धायबर यांनी त्यांच्या फेसबुकवर लिहिलेली पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे…
आई म्हणजे आयुष्याचा पाया. तिच्या कष्टावर उभं राहिलेलं घर, तिच्या मायेने फुललेलं कुटुंब आणि तिच्या त्यागाने घडलेली मुलं हीच खरी संपत्ती. आज हा लेख लिहिताना मन भरून येतं, कारण हा केवळ आजारपण आणि शस्त्रक्रियेचा प्रवास नाही; हा एका आईच्या वेदनांचा, धैर्याचा आणि पुन्हा उभं राहण्याच्या जिद्दीचा प्रवास आहे…
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाघाळे या गावात आई-वडील राहतात. साधं, शांत, कष्टकरी आयुष्य. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्वी नाजूक असल्यामुळे नाल्याची, रस्त्यांची, विहिरींची जडीपाची प्रंचंड कामं आईला करावी लागली. शेतकाम, घरकाम, पाहुणचार, सण-उत्सव, प्रत्येक गोष्टीत आई अग्रेसर. पहाटे उठून घर आवरणे, शेतात राबणे, मुलांच्या शिक्षणासाठी धडपड, घरातील प्रत्येकाची काळजी, या सगळ्यात तिच्या स्वतःच्या तब्येतीकडे कधी लक्षच गेलं नाही. पण, वय वाढत गेलं तसे गुडघ्याचं दुखणं सुरू झालं. सुरुवातीला किरकोळ वाटणारा त्रास हळूहळू असह्य होऊ लागला.
चालताना वेदना
बसल्यानंतर उठताना कळा
रात्री झोप न लागणे
पण आईने कधी तक्रार केली नाही. “बरं होईल” असं म्हणत ती वेदना सहन करत राहिली.
आईचा त्रास असह्य झाल्यानंतर भाऊ शरद जवळच्या दवाखान्यांत घेऊन जायचा. औषधं, इंजेक्शन घ्यायचं, काही दिवस आराम… आणि पुन्हा तेच चक्र सुरू. मी पुण्यातून गावाला गेलो की आईला डॉक्टरांकडे घेऊन जाणं ठरलेलं असायचं. तिच्या डोळ्यांतली वेदना पाहवत नव्हती. पण शस्त्रक्रियेच्या नावाने ती घाबरायची. पुण्यातील कमला नेहरू रुग्णालय येथील अधीक्षक डॉ. प्रशांत बोठे यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. त्यांनी स्पष्ट सांगितलं-
“गुडघा पूर्ण झिजला आहे. आता शस्त्रक्रिया हाच कायमचा उपाय.”
नगरचे पत्रकार मित्र विजयसिंह होलम यांच्या आईचीही अशीच शस्त्रक्रिया झाली होती. त्यांनी आईशी संवाद साधला. भाचा आकाश भोईटे याने आईशी शांतपणे बोलून भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर हळूहळू आई शस्त्रक्रियेसाठी तयार झाली. हा निर्णय फक्त वैद्यकीय नव्हता; तो भावनिक होता. कारण आईसाठी शस्त्रक्रिया म्हणजे अनोळखी भीती.
View this post on Instagram
शरद हा नामांकित कंपनीत काम करत असल्यामुळे आईचा मेडिक्लेम होता. पण, डॉ. प्रशांत बोठे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. आईला कमला नेहरू रुग्णालयात दाखल केलं. मनात काळजी, डोळ्यांत प्रार्थना. पण, डॉक्टर घरच्यासारखे असल्यामुळे मनात भिती नव्हती. डॉ. प्रशांत बोठे, डॉ. मंदार नागमोडे आणि डॉ. आकाश डोळसे यांच्या टीमने उजव्या गुडघ्याची शस्त्रक्रिया सुरू केली. पण वयामुळे हाडे ठिसूळ झाली होती. ऑपरेशनदरम्यान हाडाला क्रॅक गेला. त्यामुळे एकाऐवजी दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.
तो क्षण आमच्यासाठी अत्यंत तणावाचा होता.
आईला वेदना झाल्या.
मनात भीती दाटून आली.
पण, डॉ. प्रशांत बोठे आणि डॉ. मंदार नागमोडे यांनी समजावून सांगितले. केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर आपुलकीने त्यांनी उपचार केले. त्यांनी “रुग्ण” नव्हे, तर “मावशी” म्हणून काळजी घेतली.
त्या दिवशी एक जाणवलं…
सरकारी रुग्णालयातही माणुसकी जिवंत आहे. खाजगी रुग्णालयापेक्षा अधिक जिव्हाळ्याने सेवा मिळू शकते. कमला नेहरू रुग्णालयातील सर्वांनीच मदत करत सरकारी रुग्णालय नसून, खाजगी रुग्णालयापेक्षा येथे रुग्णांची चांगली काळजी घेत असल्याचे दाखवून दिले.
आई शस्त्रक्रियेनंतर काही दिवस कमला नेहरू रुग्णालयात थांबली. त्यानंतर जवळपास एक महिना आई बेडवर होती, भावाकडे. शिक्रापूरला.
शस्त्रक्रियेच्या काळात—
औषधं वेळेवर देणं
फिजिओथेरपी नियमित करणं
आईचं मनोबल टिकवणं
घरातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी उचलली.
आई कधी कधी म्हणायची,
“तुम्हाला त्रास देत आहे.”
पण खरं तर आयुष्यभर तिने आमच्यासाठी जे केलं, त्यापुढे हे काहीच नव्हतं.
आई पुन्हा चालू लागली…
हळूहळू आई उठू लागली.
वॉकरचा आधार घेतला.
नंतर काठी.
आणि आज…
आई काठीशिवाय चालते.
गुडघ्यातील ठसठस थांबली आहे.
रात्री शांत झोप लागते.
चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आहे.
ती म्हणते,
“आता बरं वाटतं… हलकं वाटतं.”
कृतज्ञतेची भावना…
हा प्रवास आम्हाला खूप काही शिकवून गेला—
वेदना लपवणारी आई किती मजबूत असते
कुटुंबाची साथ किती महत्त्वाची असते
डॉक्टरांवरील विश्वास किती मोठा आधार असतो
डॉ. प्रशांत बोठे आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार.
कमला नेहरू रुग्णालयातील प्रत्येक कर्मचारी, मित्रपरिवार आणि कुटुंबीय—सर्वांचे ऋण मानावे तितके कमीच आहे.
आई आयुष्यभर आमच्यासाठी चालत राहिली.
आज ती पुन्हा निर्धास्तपणे चालताना दिसते, तेव्हा डोळे पाणावतात.
आईचे हसू, तिची शांत झोप, तिची निर्धास्त पावले—
यापेक्षा मोठं समाधान नाही.
खरंच, आईच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच आमचं खरं यश आहे.
सर्वांचेच खूप खूप धन्यवाद!
– संतोष धायबर, पत्रकार
santosh.dhaybar@gmail.com
तीन अनुभव! अजित दादांचा फोन आला; दादा नक्कीच अजून आहेत…
अजित दादा पवार तुमच्यासाठी महाराष्ट्र रडला…
पुणे-नगर ‘भविष्यात’ होणारा महामार्ग पिढीसाठी राहणार स्वप्नच…
महाराष्ट्रात ‘मुलींना उच्च शिक्षण मोफत’ची घोषणा; पण परिस्थिती पूर्ण उलटी…
पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयातील कौतुकास्पद वैद्यकीय सेवा! https://t.co/PLQq0HNtew @PMCPune @ChaloPmc @PrakashAbitkar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @supriya_sule @PawarSpeaks @mohol_murlidhar @SantoshDhaybar @MoHFW_INDIA pic.twitter.com/kOW6LrbhQi
— mahabharat news (@mahabharatnewss) March 6, 2026