पुणे: पत्रकार संतोष धायबर यांनी पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीबाबत फेसबुकवर लिहीले असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपले मत नोंदवताना दिसत आहेत. संबंधित लेख पुढीलप्रमाणे…

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
पुणे-नगर ‘भविष्यात’ होणारा महामार्ग पिढीसाठी राहणार स्वप्नच…
पुणे-अहिल्यानगर महामार्गाचा प्रश्न आता केवळ रस्त्याचा विषय राहिलेला नाही, तर तो संपूर्ण प्रदेशाच्या विकासाला अडथळा ठरत चालला आहे. निवडणूका आल्या की राजकीय पक्ष व नेते फक्त घोषणांची आतषबाजी करत आहेत, पण प्रत्यक्ष काम सुरू होताना दिसत नाही. महामार्ग कधी होणार? कोण करणार? निधी कुठे आहे? जमीन अधिग्रहण झाले का? या कोणत्याच प्रश्नांची उत्तरं जनतेसमोर ठेवली जात नाहीत. यामुळे पुणे-नगर ‘भविष्यात’ होणारा महामार्ग या पिढीसाठी तरी स्वप्नच राहणार की काय? असे वाटू लागले आहे…
पुणे-नगर महामार्गावर कोणत्याही वेळेला प्रवास केला तरी परिस्थिती एकसारखीच असते. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे दररोज लाखो रुपयांचे इंधन जळते, हजारो नागरिकांचा बहुमुल्य वेळ वाया जातो, तर रुग्णवाहिकांना होणारा उशीर रुग्णांच्या जीवावर उठत आहे. ही समस्या कोणाला दिसत नाही का? निवडणुका आल्या की रस्ता होणार आश्वासने दिली जातात. निवडणुका संपल्या की विषय कुठल्या-कुठे जातो कळतही नाही. आर्थिक विकास, औद्योगिकीकरण, गुंतवणूक व रोजगार या सर्वांची गाडी या महामार्गावरच अडकलेली आहे. शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी आवाज उठवला, रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. पण, घोषणांव्यतिरिक्त काही बदल झाला नाही. मग प्रश्न असा की नेमके अडथळे कुठे आहेत? आणि जबाबदार कोण?
View this post on Instagram
पुणे-अहिल्यानगर महामार्ग हा पुणे जिल्हा, नगर जिल्हा आणि मराठवाडा या प्रदेशांचा जीवनदायी मार्ग मानला जातो. औद्योगिक प्रगती, शेती उत्पादनांची वाहतूक, शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगारासाठी दररोज लाखो नागरिक या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहतूक कोंडी विक्राळ रूप धारण करीत आहे. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा वाहने दुप्पट-तिप्पट वाढली, पण मार्गाची सुधारणा मात्र तितकीशी झाली नाही.
रुग्णवाहिका अडकल्यामुळे धोक्यात जीव…
वाहतूक कोंडीचा सर्वात धोकादायक परिणाम आकस्मिक वैद्यकीय सेवांवर होत आहे. रुग्णवाहिका सायरन वाजवत मार्ग काढण्याचा प्रयत्न करते, पण वाहने हलत नाहीत. गंभीर रुग्ण, अपघातग्रस्त, गर्भवती महिला यांच्या उपचारांना होणारा विलंब वाचवता येण्यासारखा नसतो. वाहतूक कोंडीमुळे कित्येकांचे जीव गेले आहेत. पण, याचे कोणाला सोयरसुतक नाही. महामार्गामुळे होणारा प्रत्येक मिनिटाचा विलंब रुग्णाच्या जीवनासाठी निर्णायक ठरू शकतो. आजून किती जणांना मुकावे लागणार हे माहित नाही.
पुणे-नगर महामार्गासाठी विविध घोषणा झाल्या आहेत. फोर लेन होणार, सिक्स लेनचा प्रकल्प मंजूर, नवीन बायपास, मेट्रो सुरू होणार, रेल्वे जाणार, प्रवास सुखकर होणार? या सर्व घोषणा निवडणूक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये वारंवार ऐकू येतात. परंतु, प्रत्यक्ष काम जसेच्या तसे थांबलेले दिसते. तारीख पे तारीख सांगितली जाते. जानेवारी महिन्यात रस्त्याचे भूमिपूजन म्हणून बातम्या पेरल्या गेल्या. नेमके भूमिपुजून कोठे केले हे काही कोणी पाहिलेले नाही. रस्त्यावरची गंभीर परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होताना दिसत आहे.
वाहतूक कोंडी आणि पोलिसांची झुंज…
रस्त्यांवरील वाहनांची संख्या आणि औद्योगिक परिसराचा विस्तार या सगळ्या गोष्टींनी वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण केला आहे. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिस उन, पाऊस, धूळ, धूर आणि प्रदूषणात उभे राहून ट्रॅफिक नियंत्रित करण्याची जबाबदारी पार पाडत असतात. पण, त्यांनाही एक मर्यादा आहे. रस्ता छोटा आणि वाहने जास्त. पोलिस तरी काय करणार आणि किती दिवस सहन करणार. रस्ता मोठा अथवा पर्याय उपलब्ध झाल्याशिवाय वाहतूक कोंडीचे कायमस्वरूपी निराकरण शक्यच नाही. वाहतूक पोलिसांना रोजचे आव्हान केवळ कोंडी संपवण्याचे नसते. त्यांना नागरिकांची सुरक्षितता, अपघात नियंत्रण, शिस्त आणि तातडीच्या मार्गांना प्राधान्य देणे ही सुद्धा जबाबदारी असते.
पीएमपीएमएलच्या चालकांना सलाम…
पुणे-नगर महामार्गावरून एक वेळेस वाहन चालवणे म्हणजे मोठी अग्निपरिक्षा आहे. पण, पीएमपीएमएलचे चालक या वाहतूक कोडींमधून अनेकदा बसेस चालवतात. अनेक प्रवाशांना सुखरूप पोहचवतात. वाहतूक कोंडीचा त्यांच्या मानसिकतेवर किती परिणार होत असेल? याचा विचार कोणी केला आहे का? खरंच, पुणे-नगर महामार्गावरून बस चालवणाऱ्या चालकांना सलामच ठोकला पाहिजे.
तासन्तास कोंडीचे परिणाम…
– दररोज सकाळी आणि संध्याकाळी या मार्गावर परिस्थिती एकसारखी असते.
– वाहने रांगेत उभी, सिग्नल्स अडकलेले, चौकांमध्ये धूळ आणि हॉर्नची दहशत.
– रांजणगाव MIDC असल्यामुळे औद्योगिक मालवाहतूक अनियमित, खर्च वाढतो.
– शेतकऱ्याचा भाजीपाला व माल शहरात पोहचायला उशीर झाल्यामुळे भाव पडतात.
– व्यावसायिक, पुरवठा साखळी विस्कळीत होते.
– विद्यार्थी / कर्मचाऱ्यांचे नुकसान होते.
– प्रवास तणावपूर्ण होत असल्यामुळे औद्योगिक गुंतवणूक मंदावते, रोजगाराच्या संधी कमी होतात.
– ३०–४० मिनिटांचा प्रवास २–३ तासांपर्यंत वाढतो
– इंधनाचा मोठा अपव्यय
– आर्थिक नुकसान, मानसिक तणाव
दररोज होणारा हा अपव्यय एकत्रित केला तर तो कोट्यवधींच्या आर्थिक नुकसानात रूपांतरित होतो.
थोडक्यात ,नागरिकांचा उपरोधिक सवाल असा आहे की, आवाज उठवण्यापेक्षा प्रकल्प गतीने का सरकत नाही? हा महामार्ग आपण पाहणार आहोत की नाही; कदाचित पुढील पिढीही नाही. ही निराशा फक्त रस्त्यामुळे नाही, तर वारंवार केलेल्या फोल आश्वासनांमुळे आहे. पुणे-नगर महामार्ग प्रदेशाच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाचा कणा आहे. हा प्रकल्प लांबल्याने संपूर्ण जनजीवनावर विपरीत परिणाम होतो आहे. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे एक ना एक दिवस उद्रेक होणार हे नक्कीच.
– संतोष धायबर, पत्रकार
santosh.dhaybar@gmail.com