पुणे : पत्रकार संतोष धायबर यांनी त्यांच्या फेसबुकवर एक लेख पोस्ट केला आहे. संबंधित लेख जसाची तसा पुढीलप्रमाणे…
तीन अनुभव! अजित दादांचा फोन आला; दादा नक्कीच अजून आहेत…
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने वाघाळे (ता. शिरूर, जि. पुणे) या गावात चार दिवस राहता आले. या चार दिवसांत निवडणुकीचे पारंपरिक वातावरण तर पाहायला मिळालेच, पण त्यासोबत तंत्रज्ञानाचा विशेषतः एआयचा ग्रामीण भागातील नागरिकांवर होणारा प्रभावही प्रत्यक्ष अनुभवता आला. यावेळी निवडणुकीदरम्यान एआयच्या माध्यमातून तयार केलेले ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या. काही नागरिकांच्या मोबाईलवर “दादांच्या आवाजात” फोन कॉल येत होते…
घटना पहिली…
वाघाळे गावातील चौकात काही वृद्ध महिला निवडणुकीच्या गप्पा मारत बसल्या होत्या. संवाद साधताना त्यापैकी एक महिला म्हणाली, “मला अजित दादा पवार यांचा फोन आला होता… म्हणजे दादा जिवंत आहेत. बहुतेक दादांना दुसरीकडे फोन लावायचा असेल पण चुकून माझ्या मोबाईलवर आला. दादा नक्कीच अजून आहे.” अजित दादा या विषयावर त्यांच्या गप्पा ऐकण्याबरोबरच दादांवरील त्यांचे प्रेम दिसून येत होते.
राजकारणापेक्षा भावना अधिक होत्या. महिलेच्या चेहऱ्यावर दिसणारा विश्वास हा तंत्रज्ञानाच्या परिणामापेक्षा एका नेत्याविषयी असलेल्या जिव्हाळ्याचा होता. एआयने तयार केलेला आवाज तिच्यासाठी खोटा नव्हता; तो तिच्या आठवणींना स्पर्श करणारा अनुभव होता. ही घटना ग्रामीण समाजात माहिती आणि तंत्रज्ञान यांच्यातील अंतर दाखवणारी आहे. एआयच्या मदतीने तयार होणारे ऑडिओ किंवा व्हिडिओ किती वास्तव वाटू शकतात आणि ते लोकांच्या भावनांवर कसा परिणाम करू शकतात, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
निवडणूक प्रचार फक्त सभा, बॅनर आणि पदयात्रांपुरता मर्यादित राहिलेला नाही. सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप आणि आता एआय-आधारित सामग्रीही प्रचाराचा भाग बनत आहे. पण तंत्रज्ञान जितके प्रभावी होत आहे, तितकी माहितीची सत्यता तपासण्याची गरजही वाढत आहे. भविष्यातील निवडणुका भावना ठरवतील की कृत्रिमरित्या तयार केलेल्या भावनिक संदेशांचा प्रभाव ठरवेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
घटना दुसरी…
शिरूर तालुक्यात निवडणुकीचा प्रचार जोरात पाहायला मिळाल. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचारफेऱ्या, कार्यकर्त्यांची ये-जा आणि वाहनांची मोठी वर्दळ दिसत होती. मात्र, या गडबडीत एक वेगळीच बाब लक्षात आली. अनेक वाहनांवर नंबर प्लेटच दिसत नव्हत्या. शिवाय, काचाही काळ्या होत्या. वेग इतका होता की रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना बाजूला व्हावे लागत होते. निवडणुकीच्या उत्साहात वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.
निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी अधिक काटेकोरपणे पाळली जाणे अपेक्षित असते, पण प्रत्यक्षात नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत होते. लोकशाहीचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुकीत सुरक्षितता आणि शिस्त यांनाही तितकेच महत्त्व आहे. प्रचाराच्या उत्साहात नियमांचे पालन होत नसल्याचे प्रकर्षाने जाणवले.
घटना तिसरी…
वाघाळे गावात निवडणुकीच्या वातावरणात काही चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. गावातील काही ठिकाणी चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यापैकी एक घटना विशेषतः हृदयद्रावक ठरली. ऊस तोडणीचे काम करण्यासाठी आलेल्या मजुरांच्या झोपडीतून चोरट्यांनी रोख रक्कम चोरली. हातावरचे पोट आणि काबाड कष्ट करून जमा केलेले पैसे एका क्षणात लांबवल्यामुळे त्या कुटुंबावर मोठा आघात झाला. या घटनेची माहिती गावात पसरताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. ही घटना केवळ चोरीची नव्हती, तर ग्रामीण भागातील स्थलांतरित मजुरांच्या असुरक्षिततेची जाणीव करून देणारी होती. लोकशाहीचा उत्सव सुरू असतानाच समाजातील दुर्बल घटकांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे या प्रसंगाने अधोरेखित केले.
दरम्यान, ग्रामीण भागात झपाट्याने बदल घडताना पाहायला मिळतात. पण, नव्या पिढीबरोबरच जुनी पिढीही अनुभवांना सामोरे जात आहे. तिन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी भविष्यात विचार करायला लावणाऱ्या आहेत.
– संतोष धायबर, पत्रकार
santosh.dhaybar@gmail.com
अजित दादा पवार तुमच्यासाठी महाराष्ट्र रडला…
पुणे-नगर ‘भविष्यात’ होणारा महामार्ग पिढीसाठी राहणार स्वप्नच…
महाराष्ट्रात ‘मुलींना उच्च शिक्षण मोफत’ची घोषणा; पण परिस्थिती पूर्ण उलटी…