अजित दादा पवार तुमच्यासाठी महाराष्ट्र रडला…

ajit-pawar
Share

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण बुधवारी (ता. २८) अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्याविषयी पत्रकार संतोष धायबर यांनी फेसबुकवर लिहिलेला लेख पुढीलप्रमाणे…

महाराष्ट्र रडला…
महाराष्ट्रासाठी २८ जानेवारी २०२६ हा दिवस काळा ठरला. एका भीषण अपघाताने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि भावनिक जीवनावर घाव घातला. जनतेशी नाळ जोडलेला, सत्तेच्या शिखरावर असूनही सामान्य माणसाशी आपुलकी जपणारा एक ज्येष्ठ नेता म्हणजेच अजित दादा पवार. विमान अपघाताने अचानक काळाच्या पडद्याआड गेला… आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. अपघाताची बातमी जशी जशी पसरत गेली, तसतशी विश्वास बसू न शकणारी शांतता दाटून आली. क्षणात हास्य मावळलं, चर्चेला विराम लागला, आणि प्रत्येक चेहऱ्यावर अविश्वासाचे भाव उमटले. “हे खरं कसं असू शकतं?” हा प्रश्न प्रत्येकाच्या ओठांवर होता.

अजित पवार यांच्यावर आज बारामतीत झालेल्या अंत्यसंस्कारावेळी हे दुःख शब्दांत मावणारे दिसत नव्हते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत, महिला, युवक, शेतकरी, कामगार सर्वजण डोळ्यांत अश्रू घेऊन शेवटचा निरोप देण्यासाठी जमले होते. त्या अंत्ययात्रेत राजकारण नव्हतं, पक्ष नव्हता, होतं फक्त एक अतूट नातं… नेत्याचं आणि जनतेचं. आपल्या लाडक्या दादाचं…

अंत्यसंस्कारादरम्यान उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रू थांबताना दिसत नव्हते. काही जण नुसतेच मूकपणे उभे राहून आपलं दुःख गिळताना दिसत होते. कामाचा माणूस गेला, ही भावना प्रत्येक चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. हा केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हता, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी पर्व संपलं होतं. निर्णयक्षमता, कठोर भूमिका, पण गरजूंप्रती असलेली माया. या साऱ्यामुळे तो नेता केवळ सत्ताधारी नव्हता, तर जनतेचा आधार होता. लाडका दादा सर्वांना जवळचा वाटत होता. आज महाराष्ट्र रडतो आहे. रस्ते शांत आहेत, मनं अस्वस्थ आहेत आणि भविष्याबाबत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. तरीही, दादांच्या आठवणी, त्यांचे निर्णय आणि जनतेसाठी केलेलं काम हे कायम स्मरणात राहील.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

मिश्किल अजितदादांच्या अविस्मरणीय आठवणी…
राजकारणात कडकपणा, निर्णयांमध्ये ठामपणा आणि व्यक्तिमत्त्वात मिश्किलपणा असलेल्या दादांच्या आठवणींनी फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर अक्षरशः महापूर उसळलेला दिसतो आहे. कधी एखाद्या सभेतले त्यांचे रोखठोक वाक्य, कधी अधिकाऱ्यांना दिलेली थेट सूचना, तर कधी कार्यकर्त्यांशी केलेली मिश्किल टिप्पणी. हे सगळे क्षण नागरिक आठवणींमधून बाहेर काढत आहेत. “राजकारणात स्पष्ट बोलणारा नेता,” “काम न झालं तर कानउघाडणी करणारा पण मनाने आपला”—अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जात आहेत.

राजकारण बहुतेक वेळा गंभीर, तणावपूर्ण आणि दुरावलेलं वाटतं. पण अजितदादांचा मिश्किल स्वभाव हा त्या चौकटीबाहेरचा होता. एखाद्या सभेत अचानक केलेली टिप्पणी असो वा पत्रकारांशी बोलताना दिलेले उत्तर, त्यात एक सहजता होती. हाच मानवी स्पर्श आज लोकांना पुन्हा आठवतो आहे.

एआयच्या व्हिडिओने रडवले…
तंत्रज्ञानाने माणसाचं आयुष्य सोपं केलं, संवाद वेगवान केला; पण अलीकडच्या काळात तेच तंत्रज्ञान भावनांशी जोडताना दिसत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) सहाय्याने तयार केलेला अजित दादांच्या एका व्हिडिओने अक्षरशः रडवलं. काही सेकंदांच्या त्या दृश्यांनी वास्तव आणि कल्पनेची सीमारेषा पुसली गेली आणि हजारो लोक भावनिक भोवऱ्यात सापडले. व्हिडिओ पाहताच अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले. कुणी तो शेअर केला, कुणी श्रद्धांजली लिहिली, तर कुणी मौन पाळलं.

शेवटच्या प्रवासाला निघून गेले…
नेहमी भेटी, बैठका, वेळापत्रक आणि शब्दांनी भरलेलं आयुष्य जगणारे दादा. या वेळी मात्र कोणालाही न सांगता निघून गेले.
ना निरोप, ना शेवटचा शब्द—फक्त आठवणी मागे ठेवून.

ज्यांचं बोलणं कधी थांबत नव्हतं,
ते आज कायमचे शांत झाले आहेत.
ज्यांनी हजारो लोकांना दिशा दिली,
तेच शेवटच्या प्रवासाला एकटेच निघून गेले.

कदाचित म्हणूनच हे दुःख अधिक बोचतं…
कारण सांगून गेले असते, तर
मन तयार करता आलं असतं.
पण आयुष्य कधी तयारीची संधी देत नाही.

आज उरतात त्या फक्त आठवणी—
आवाज, शब्द, मिश्किल हास्य…
आणि मनात कायम राहणारी एक पोकळी.

कोणाला न सांगता गेले,
पण सगळ्यांच्या मनात कायमचे राहिले.

काळ थांबत नाही… पण काही रिकाम्या जागा कधीच भरून निघत नाहीत.
आज अशीच एक जागा महाराष्ट्राच्या मनात कोरली गेली आहे ती म्हणजे अश्रूंनी. दादांच्या आठवणींनी आणि न संपणाऱ्या शोकाने.
भावपूर्ण श्रद्धांजली….

– संतोष धायबर, पत्रकार
santosh.dhaybar@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *