जळगाव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध अनेकांना लागले असून, राजकीय नेत्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषद, २९ महापालिकांच्या निवडणुका कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने आता थेट तारीखच सांगितली आहे.
राज्यात मतदार यादीतील घोळावरून राज्यात राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागतील?, याबाबत संभ्रम निर्माण झालेला असताना दुसरीकडे मात्र शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे महत्त्वाचे नेते असलेले राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आचारसंहितेची तारीखच सांगितली.
गुलाबराव पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत बोलताना म्हटले की, ‘काही जण अफवा पसरवतील की धरणगाव नगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर निधी येणार आहे, परंतु सहा तारखेला आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे आता कुणालाही कोणताही प्रमा (विकास कामांची प्रशासकीय मान्यता) मिळणार नाही. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.’
दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी देखील निवडणूक कार्यक्रमाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आता येत्या एक-दोन दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहीर होण्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. नगरपालिकांच्या प्रभागनिहाय आरक्षणासह नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले आहे. मतदार यादीही अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. तीन टप्प्यात निवडणुका पार होणार असल्याचा अंदाज आहे. नगरपालिका-नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिका अशा निवडणुका पार पडणार आहेत.
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने निवडणुकीच्या तारखा केल्या जाहीर…