देवेंद्र फडणवीस बसायला गेले अन् खुर्ची मोडली…

fadnavis-shinde-pawar
Share

पाटणा (बिहार): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान मंचावर बसताना खुर्ची अचानक तुटल्यामुळे व्यासपीठावर क्षणभर गोंधळ उडाला. पण सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. फडणवीस आणि पासवान यांनी उपस्थितांना अभिवादन करून आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. या घटनेनंतर, तात्काळ दुसरी खुर्ची मागवण्यात आली आणि जाहीर सभेचे कामकाज पुढे सुरू ठेवण्यात आले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून बिहारमध्ये दाखल झाले आहेत. बिहारच्या खगडिया जिल्ह्यात निवडणूक प्रचारादरम्यान ही घटना घडली आहे.

खगडिया जिल्ह्यातील परबत्ता विधानसभा क्षेत्रात एनडीए उमेदवार बाबूलाल शौर्य यांच्या समर्थनार्थ आयोजित भव्य सभेत अनपेक्षित असा प्रसंग घडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे मंचावर पोहोचले आणि खुर्चीवर बसत असतानाच तेथील खुर्ची अचानक तुटली. या प्रसंगाने काही क्षणांसाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. या घटनेनंतर आयोजकांनी त्वरित नवीन खुर्च्या आणून कार्यक्रम पुन्हा सुरू केला. फडणवीस आणि पासवान यांनी या घटनेला हलक्याफुलक्या अंदाजात घेतले, लोकांना हात हलवून अभिवादन केले आणि आपली भाषणे सुरू ठेवली.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, मंचावर खुर्ची तुटल्याचा आवाज होताच काही क्षणांसाठी सगळे स्तब्ध झाले, पण लगेचच सर्व काही सामान्य झाले. नेत्यांच्या विनोदी स्वभावामुळे वातावरण पुन्हा आनंदी बनले. कार्यक्रमानंतर या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही युझर्सने यामागे आयोजकांची मंच व्यवस्थेतील निष्काळजीपणा असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *