मुंबईः माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकींच्या संभाव्य तारखाच जाहीर केल्या आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना वळसे पाटील म्हणाले, ‘मी तारीख जाहीर करत नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. आमच्याकडील माहितीनुसार 5 नोव्हेंबर रोजी नगरपालिका,नगरपंचायत निवडणूक जाहीर होतील तर 15 डिसेंबरला जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदान होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरु असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होऊन 15 जानेवारीला मतदान होईल आणि 31 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील.’ दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूकांचे वेळापत्रकच जाहीर करतानाच कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचना देखील या मेळाव्यात दिल्या आहेत.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मात्र, निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. इच्छुक उमेदवारांनी मात्र प्रचाराची तयारी सुरू केली असून भेटीगाठी, दौरे आणि कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. महायुती किंवा महाविकास आघाडी होणार की नाही, याची वाट न पाहता अनेकांनी थेट प्रचारयुद्धाला सुरुवात केली आहे. निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक निवडणूक आयोगाने अद्याप जाहीर केलेले नाही. परंतु, दिलीप वळसे पाटील यांचे ‘अंदाजे’ वेळापत्रकामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.