मुंबई: महापालिका निवडणुकीदरम्यान “एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी” असा प्रचार करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये निवडणुकीचा निकाल लागताच दुरावा निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. कल्याण–डोंबिवलीत मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल करताना म्हटले की, “ज्यांनी शिवसेनेशी आणि ठाकरे कुटुंबाशी बेईमानी केली, अशा गद्दारांशी कोणतेही राजकीय किंवा अन्य संबंध ठेवायचे नाहीत, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. शिंदेंची शिवसेना ही आमच्यासाठी एमआयएमसारखी आहे. ती बेईमान आणि महाराष्ट्रद्रोही आहे.”
‘स्थानिक निर्णय’ म्हणून विषय संपत नाही
मनसेकडून हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी संजय राऊत यांनी ही भूमिका फेटाळून लावली. “फक्त स्थानिक निर्णय म्हणून हा विषय संपत नाही. पक्षाच्या मूळ ध्येयधोरणाशी प्रतारणा होत असेल, तर पक्षनेतृत्वाने थेट हस्तक्षेप करून कारवाई केली पाहिजे,” असे राऊत म्हणाले.
राज ठाकरेंना थेट आवाहन
कल्याण–डोंबिवलीतील मनसे–शिंदेसेना युतीला राज ठाकरे यांचा पाठिंबा नसेल, तर त्यांनी तो कारवाईतून दाखवून द्यावा, अशी थेट मागणी संजय राऊत यांनी केली.“एखाद्या चिन्हावर निवडून येऊन कुणी बेडूक उड्या मारत असेल, तर नेतृत्वाने कारवाई करून निर्णय मान्य नाही, हे स्पष्ट करायला हवे,” असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचा दाखला देत इशारा
राऊत यांनी अंबरनाथमधील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांवर पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे करण्यात आलेल्या कारवाईचा दाखला देत, “पक्षशिस्तीचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा,” असा इशाराही दिला.
राजकीय वर्तुळात खळबळ
मनसे आणि शिंदे गटाच्या जवळिकीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, ठाकरे बंधूंमधील राजकीय एकत्रिकरणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.