मुंबईत मध्यरात्री नाट्यमय घडामोडी, राजकीय वर्तुळात चर्चांना पूर्णविराम?
मुंबई: राज्यात सत्तासंघर्ष आणि पक्षफुटीचे वारे वाहत असतानाच, मुंबईतील राजकीय वर्तुळातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के अखेर पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात आल्या आहेत.
गट नोंदणीवेळी गैरहजेरीमुळे खळबळ
बुधवारी मुंबईतील कोकण भवन येथे शिवसेना (ठाकरे गट)च्या ६५ नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी प्रक्रिया पार पडली. मात्र या महत्त्वाच्या प्रक्रियेदरम्यान प्रभाग क्रमांक १५७ मधून ‘मशाल’ चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के या गैरहजर होत्या. विशेष म्हणजे त्यांचा मोबाईल फोनही बंद असल्याने पक्षात एकच खळबळ उडाली होती.
शिंदे गटात जाण्याच्या चर्चांनी घेतला जोर
डॉ. सरिता म्हस्के या अचानक संपर्काबाहेर गेल्याने त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या संपर्कात असून लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. गट नोंदणीच्या वेळी एका महत्त्वाच्या नगरसेविकेची अनुपस्थिती ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरली होती.
मध्यरात्री मिळाली मोठी कलाटणी
दिवसभर सुरू असलेल्या या नाट्यमय घडामोडींनंतर मध्यरात्री या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली. आज पहाटे तीन ते चारच्या सुमारास डॉ. सरिता म्हस्के या ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. त्यामुळे त्या पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाले.
‘फोडाफोडी’चा प्रयत्न झाल्याचा दावा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सरिता म्हस्के या शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या संपर्कात होत्या. त्यांच्याकडून ठाकरे गटातील नगरसेविकेला फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. मात्र अखेर त्या ठाकरे गटाच्या संपर्कात आल्याने संभाव्य पक्षांतर टळल्याचे चित्र आहे.
स्पष्टीकरणाकडे सर्वांचे लक्ष
निवडून आल्यानंतर अचानक ‘नॉट रिचेबल’ होण्यामागे नेमके काय कारण होते? शिंदे गटाच्या संपर्कातील चर्चांवर डॉ. सरिता म्हस्के स्वतः काय स्पष्टीकरण देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या भूमिकेमुळे या प्रकरणातील संपूर्ण सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.