पुणे : विवाह केलेली पत्नी घरात असताना दुसरे लग्न करणे आणि त्याचे सोशल मीडियावर प्रदर्शन करणे एकाला महागात पडले आहे. दुसऱ्या पत्नीसोबतचे फोटो आणि स्टेटस अपडेट करून पहिल्या पत्नीचा मानसिक छळ करणाऱ्या पतीसह तब्बल १० जणांवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील ‘दुसरी पत्नी’ सध्या जिल्हा परिषद निवडणुकीत एका राष्ट्रीय पक्षाकडून नशीब आजमावत आहे.
पीडित महिलेचा सिद्धेश्वर नामदेव काळभोर यांच्याशी रीतसर विवाह झाला आहे. सिद्धेश्वर यांनी एका महिलेशी दुसरे लग्न केले. धक्कादायक बाब म्हणजे, हे लग्न लपवून न ठेवता पती आणि त्याच्या नातेवाईकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा उघड प्रचार सुरू केला. लग्न केलेल्या महिलेच्या नावापुढे पतीचे नाव लावून फोटो, स्टेटस आणि पोस्ट अपलोड करण्यात आल्या, ज्यामुळे पहिल्या पत्नीची सामाजिक बदनामी झाली.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती सिद्धेश्वर आणि दुसरी पत्नी यांनी तिला अश्लील मेसेज करून मानसिक त्रास दिला. इतकेच नाही तर जिल्हा परिषदेच्या प्रचारादरम्यान महिला ही सिद्धेश्वर यांची पत्नी असल्याचे सांगच घरोघरी जाऊन प्रचार केला. ठिकठिकाणी लावलेले फ्लेक्स आणि व्हॉट्सॲप स्टेटस पाहून पीडितेच्या दोन मुलांच्या मनावरही गंभीर परिणाम झाला. अखेर या छळाला कंटाळून पत्नीने कायद्याचा आधार घेतला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणी पती सिद्धेश्वर काळभोर, दुसरी पत्नी, दीर, जाऊ आणि मावशीसह १० नातेवाईकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत हा प्रकार उघड झाल्याने राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली असून, जिल्हा परिषद उमेदवाराच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.