नवी दिल्ली: राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्रपणे सुमारे पाच ते सहा मिनिटे भेट घेतल्याची माहिती आहे. मात्र या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याचा तपशील समोर आलेला नसल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
सध्या दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक घेतली. या बैठकीदरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर लगेचच प्रफुल पटेल यांनी मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत चर्चा अधिक तीव्र झाल्या आहेत. अजित पवार हयात असतानाच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला होता, अशी माहिती यापूर्वी समोर आली होती.
प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे आणि केंद्रीय पातळीवरील निर्णयप्रक्रियेत अग्रस्थानी असलेले नेते मानले जातात. त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी त्यांनी घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
विलिनीकरणावर चर्चा नाही, प्रफुल पटेलांचे स्पष्टीकरण
दरम्यान, अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार, तसेच दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. प्रफुल पटेल यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपद जाणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
“राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय माझ्याशिवाय होईल,” असे स्पष्ट करत प्रफुल पटेल यांनी या चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडेच राष्ट्रीय अध्यक्षपद जाण्याचे अप्रत्यक्ष संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे.
तसेच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे सांगत प्रफुल पटेल यांनी या विषयावर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यावरून झालेल्या टीकेवर बोलताना, “सुनेत्रा पवार यांनी किती दिवस दुःख मानावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे,” असे म्हणत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.