नवी दिल्ली: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र या सर्व तर्क-वितर्कांना आता स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी पूर्णविराम दिला आहे.
नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय योग्य रीतने, योग्य दिशेने आणि योग्य व्यक्तीचाच होईल. मात्र तो निर्णय माझ्याशिवाय होईल.” आपण या पदाच्या स्पर्धेत नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
टीकाकारांवर जोरदार हल्लाबोल
आपल्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर नाराजी व्यक्त करताना पटेल म्हणाले,“जे लोक कधीच जनतेत जाऊन निवडणूक लढले नाहीत, त्यांनी माझ्याबद्दल चर्चा करणं योग्य आहे का? १९५२ पासून माझ्या वडिलांना जनतेनं निवडून दिलं आणि मलाही अनेक वेळा लोकांनी निवडून दिलं आहे. आमच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.”अध्यक्षपदाबाबत पक्षात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी हे प्रकार “अत्यंत घाणेरडे” असल्याचेही म्हटले.“मी राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष म्हणून अजितदादांच्या निधनानंतर पुढील नेतृत्वाबाबत जबाबदारी पार पाडतो आहे आणि ती योग्य प्रकारे पार पाडत राहीन,” असा दावाही त्यांनी केला.
राज ठाकरेंना प्रत्युत्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “राष्ट्रवादीसारख्या रांगड्या पक्षाचा अध्यक्ष मराठीच हवा” असे वक्तव्य करत पटेल यांच्यावर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना पटेल म्हणाले,“राज ठाकरे किंवा इतर कोणी आमच्या पक्षाचा अध्यक्ष किंवा विधीमंडळ नेता कोण होणार, हे ठरवणार आहेत का? उपमुख्यमंत्रीपदाबाबत जसा योग्य निर्णय घेतला, तसाच योग्य निर्णय राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतही घेतला जाईल.”
सुनेत्रा पवार यांच्या निवडीची शक्यता बळावली
प्रफुल्ल पटेल यांनी अधिकृतपणे अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. पक्षांतर्गत प्रक्रिया सुरू असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.