बारामती: अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता अजित पवारांकडे असलेल्या विविध सहकारी संस्था, शिक्षणसंस्था आणि संघटनांतील पदांची वाटणी पवार कुटुंबात होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बुधवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीला शरद पवार, पार्थ पवार, तसेच जय पवार उपस्थित होते. अजित पवार अध्यक्ष किंवा संचालक असलेल्या संस्थांमध्ये त्यांच्या जागी पवार कुटुंबातील सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे यावेळी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अजित पवार हे माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन, विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सदस्य, रयत शिक्षण संस्था संचालक आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशा विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. या सर्व पदांवर आता पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लागणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही महत्त्वाची पदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तर जय पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची बैठक संपल्यानंतर शरद पवार, पार्थ पवार, जय पवार आणि विजया पाटील यांची स्वतंत्र बैठक सुरू असल्याची माहिती आहे. या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जाणार, याबाबत उत्सुकता आहे. यानिमित्ताने पवार कुटुंबातील भविष्यातील राजकीय आणि संस्थात्मक समीकरणांवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?
सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या कार्यकाळास अद्याप दोन वर्षे शिल्लक असून त्यांची मुदत ४ जुलै २०२८ रोजी संपणार आहे. मात्र, त्याऐवजी पार्थ पवार यांना सहा वर्षांच्या पूर्ण कार्यकाळासाठी राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता असल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती आहे. लवकरच ही राज्यसभेची जागा भरली जाण्याची शक्यता आहे.