चंद्रपूर: चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत शिमगा अजूनही संपलेला नसून माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील कलगीतुरा थेट दिल्लीपर्यंत जाऊनही मिटलेला नाही. या दुहीचा थेट फायदा भाजपला होण्याची शक्यता असून, चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष अधिकच रंगतदार झाला आहे.
काँग्रेसकडे संख्याबळ असतानाही अंतर्गत वादामुळे सत्तेपासून दूर राहण्याची वेळ येऊ शकते. या पार्श्वभूमीवर भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर मोठा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव ठेवला असून, ठाकरे सेना सध्या ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहे.
भाजप–उद्धव सेनेचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला काय?
चंद्रपूर महापौर पदाचा पेच सोडवण्यासाठी भाजपने नवा फॉर्म्युला पुढे केल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार महापौर पदाचा कार्यकाळ पहिल्या अडीच वर्षांत भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सव्वा-सव्वा वर्षांचा विभाग करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र आधी कोणाचा महापौर होणार, यावर दोन्ही पक्षांत चर्चा सुरू असल्याचे समजते.
ठाकरे सेनेने महापौर पदाबाबत आग्रही भूमिका घेतल्यामुळे भाजपकडून हा नवा प्रस्ताव पुढे आल्याचे बोलले जात आहे.
ठाकरे सेनेत दोन भूमिका
या मुद्द्यावर ठाकरे सेनेतून मात्र मिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी भाजपकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, “असा प्रस्ताव आल्यास विचार केला जाईल”, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपसोबत जाण्याचा दावा स्पष्टपणे फेटाळत ठाकरे सेना भाजपपासून दूरच राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजप पुढे कोणती राजकीय चाल खेळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- 10 फेब्रुवारीला महापौर-उपमहापौर निवडणूक
चंद्रपूर शहर महानगरपालिकेची महापौर व उपमहापौर निवडणूक 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
5 फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
आतापर्यंत नगर सचिव कार्यालयातून 10 उमेदवारी अर्जांची उचल झाली असून, त्यापैकी 8 अर्ज भाजप गटाकडून तर 2 अर्ज काँग्रेस गटाकडून उचलले गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
अर्ज भरताना महापौर पदाचा उमेदवार तसेच सूचक आणि अनुमोदक यांची प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक आहे. सत्तेचा तिढा अधिक गुंतत चालल्याने, शेवटच्या क्षणी कोणते पक्ष आणि कोणते गट मैदानात उतरतात, याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.