उपमुख्यमंत्रिपदानंतर सुनेत्रा पवारांकडे आणखी मोठी जबाबदारी पण राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर अजूनही सस्पेन्स

Share

बीड व पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. नुकताच सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यानंतर आता त्यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांची बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचा अधिकृत सरकारी आदेशही जारी करण्यात आला आहे.

यापूर्वी हे दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होते. आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते. मात्र, तेव्हा अजित पवार यांनी ही जबाबदारी स्वतःकडेच ठेवली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर आता हीच जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर अजूनही अनिश्चितता

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांची या पदावर निवड झाल्याची चर्चा होती. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी हा दावा फेटाळून लावत, “अजून कोणाचीही राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झालेली नाही आणि मी स्वतः या शर्यतीत नाही,” असे स्पष्ट केले आहे.

यामुळे आता राष्ट्रवादीचा पुढील सर्वोच्च नेता कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांनीच सांभाळावे, असा आग्रह पक्षातील काही नेत्यांकडून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विलीनीकरणावरही प्रश्नचिन्ह

या पार्श्वभूमीवर, दोन्ही राष्ट्रवादी गटांचे विलीनीकरण होणार का? सुनेत्रा पवार यांच्या जागी लोकसभेत कोण जाणार? तसेच पक्षाची पुढील दिशा काय असणार? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या स्पष्ट भूमिकेनंतर या चर्चांना आणखी वेग आला असून, पुढील काही दिवसांत राष्ट्रवादीच्या राजकारणात मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *