नवी दिल्ली: विरोधी पक्षांतील आंदोलकांचा खरा उद्देश केंद्रामध्ये सत्तापालट करण्याचा आहे, हे त्यांचेच वक्तव्य प्रशांत भूषण यांनी मान्य केले आहे. यावरून आंदोलकांचा अजेंडा स्पष्ट झाला आहे, असे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे सांगितले. प्रशांत भूषण यांनी गुरुवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना सत्तापालट हवा असल्याचे विधान केले होते. भूषण यांच्या सोबत एआयएसएच्या नेत्या नेहा बोरा आणि कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना प्रशांत भूषण पुढे म्हणाले, की लोकशाहीत सरकारविरोधात असंतोष पसरवणे हा गुन्हा नाही आणि आता हा लढा खऱ्या अर्थाने सत्तापालटासाठी आहे. विरोधी पक्षांना सत्तापालट हवा आहे, असा सरकारचा आरोप आहे. निवडणुका योग्य रीतीने पार पडाव्यात यासाठी आम्ही सध्या लढत आहोत. पण जर अशा प्रकारचे क्रौर्य चालूच राहिले, तर निश्चितच सत्तापालट होईल.
त्यात चुकीचं काय आहे? असा प्रश्न विचारत प्रशांत भूषण म्हणाले, की भाजपने सत्तापालटासाठी अनेक आंदोलने केली? मात्र आता सत्तापालटाचा कट रचला जात असल्याचा आरोप ते करत आहेत. त्यामुळेच हा आता खऱ्या अर्थाने एका हुकूमशाही सरकारविरुद्ध सत्तापालटाचा लढा आहे. लोकशाही चिरडून टाकणाऱ्या सरकारविरुद्ध ही आंदोलने चालू आहेत. अधिकारी आंदोलने दडपण्याचा जितका जास्त प्रयत्न करतील, तितके जास्त लोक रस्त्यावर उतरतील.
दरम्यान, अराजकता निर्माण करणे हा विरोधी पक्षांचा प्रमुख अजेंडा आहे. आंदोलन करणाऱ्या संघटनांनी देशातील तरुणांना अराजकतेच्या राजकारणातील प्यादी बनवण्याचा प्रयत्न चालविला आहे. बांगलादेशात जे घडले त्याच्या धर्तीवर सत्तापालट घडवून आणण्याचे त्यांचे ध्येय आहे, असे सिंग यांनी आज (शुक्रवारी) सकाळी लखनौमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते.
आंदोलकांपैकी एका नेत्याने पत्रकार परिषदेत जाहीरपणे सत्तापालटासाठी बांगलादेशकडून प्रेरणा मिळाल्याचे कबूल केले आहे. तर दुसऱ्या एका नेत्याने निर्लज्जपणे सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन केले आहे. यावरून त्यांचा एकमेव अजेंडा स्पष्ट होतो, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. राहुल गांधी यांना गोंधळ पसरवण्याविरोधात त्यांनी परखड इशारा दिला.
ते म्हणाले, की राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, लोकशाही म्हणजे अराजकता पसरवण्याचा, घटनात्मक संस्थांच्या विश्वासार्हतेला कमी लेखण्याचा किंवा भारताच्या विकासाच्या प्रवासात अडथळा आणण्याचा परवाना नाही, हे समजून घेतले पाहिजे.
भाजपचे प्रवक्ते सी. आर. केशवन म्हणाले, की प्रशांत भूषण रक्तपाताबद्दल बोलले, नेहा बोरा बांगलादेशबद्दल बोलतात. यावरून हे दिसून येते की राहुल गांधी आणि त्यांच्या गटासाठी ‘एसआयआर’ प्रक्रिया केवळ एक धूळफेक आहे. प्रत्यक्षात भारतीय लोकशाही रुळावरून खाली खेचणे आणि अलोकतांत्रिक मार्गाने सत्ता काबीज करणे, हाच त्यांचा छुपा हेतू आणि अराजक अजेंडा आहे.
मुख्य निवडणूक आयोगाविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपने गुरुवारी हल्ला चढवला. हा हल्ला नेहा बोरा यांच्या एका व्हीडिओवरून झाला, त्यात त्यांनी बांगलादेशातील आंदोलनांना प्रेरणादायी म्हटले होते. राहुल गांधी आणि नेहा बोरा, प्रशांत भूषण यांचा समावेश असलेल्या त्यांच्या गटाला भारतात अराजकता हवी असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे, असे केशवन यांनी सांगितले.