अहिल्यानगर: एमपीएससी पेपरफुटीवरुन पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांनी ११ दिवसांचे उपोषण आंदोलन केले होते. सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, राजीनामा देण्याऐवजी एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर गेल्याने काही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यांनी राजीनामा न दिल्याने पुण्यात पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे, पेपरफुटीतील मूळ तक्रारदार ऋषीकेश गांगर्डे यांनी यांनी येथे सांगितले. या आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टीनेही (सीजेपी) सहकार्य देऊ केले आहे.
आता, येत्या दोन महिन्यांत ‘एमपीएससी विद्यार्थी परिषद’ ही स्वतंत्र विद्यार्थी संघटना स्थापन करून तीव्र आंदोलन केले जाणार असल्याची माहिती गांगर्डे यांनी दिली. जोपर्यंत विवेक भीमनवार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. यासाठी सीजेपीचे देखील सहकार्य घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील आंदोलन केवळ विद्यार्थ्यांच्याच नेतृत्वाखाली आणि निर्णय देखील विद्यार्थीच घेणार असल्याचेही गांगर्डे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राजकीय नेत्यांनी किंवा व्यक्तींनी पाठिंबा दिल्यास त्यांचा पाठिंबा घेऊ, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले असून, ऋषीकेश गांगर्डे यांनी अखेरच्या क्षणी आंदोलनातून काढता पाय घेतला होता. सरकारकडे पाठविण्यात आलेल्या ड्राफ्टमध्ये विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी नव्हती, असे म्हणत त्यांनी अहिल्यानगर गाठले होते. या आंदोलनाचा हिरो ठरलेल्या विवेकानंद पाटील यांनीही आपले गाव गाठलं असून त्यांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले. त्यामुळे, हे आंदोलन आता संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, आमदार रोहित पवार आणि विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले होते. सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र, आता विद्यार्थी परिषदेकडून स्वतंत्रपणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.