नवी दिल्लीः देशातील खासगी अवकाश क्षेत्राने जागतिक प्रतिभा, आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची परिसंस्था निर्माण करावी. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी भारत एक आकर्षक ठिकाण बनेल, असे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले.
भारताच्या तिसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने, पंतप्रधान मोदी हे २० भारतीय अंतराळ विषयक स्टार्टअप्सचे सीईओ आणि संस्थापकांशी संवाद साधत होते. २०२३ मध्ये चंद्रावर झालेल्या चांद्रयान-३ च्या यशस्वी अवतरणाच्या स्मरणार्थ २३ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो, भारत चंद्राच्या काळोख्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पाऊल ठेवणारा पहिला देश ठरला.
“तुम्ही एका नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याचे धाडस दाखवले आहे. हे अवघड शिवधनुष्य पेलणाऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे सरकारचे धोरण आहे, त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले, तरी त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही.” असे मोदी यांनी उद्योजकांशी बोलताना स्पष्ट केले. अंतिम उद्दिष्ट साध्य होईपर्यंत प्रयत्न सोडू नका. प्रयत्नांमध्ये सातत्य राहिल्यास एक दिवस निश्चित यश लाभेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, की आपण असे वातावरण निर्माण केले पाहिजे, की जगभरातील भविष्यात यशस्वी होण्यासाठी भारतात गुंतवणूक करणे हेच योग्य ठरेल, असे जगभरातील उद्योजकांना वाटले पाहिजे. भारताचे अंतराळ क्षेत्र हे जागतिक प्रतिभावंतांसाठी एक आकर्षण केंद्र बनू शकते.
श्री. मोदींनी भारताची खर्च-स्पर्धात्मकता आणि प्रतिभा यावर प्रकाश टाकत सांगितले, की या फायद्यांमुळे देशाला जागतिक अवकाश उद्योगात वेगाने स्वतःला स्थापित करण्यास मदत होऊ शकते. त्यांनी स्टार्टअप्सना अवकाश प्रयोगांच्या पलीकडे जाऊन कृषी, पशुधन आणि दुग्धव्यवसाय यांसारख्या क्षेत्रांसोबतच, लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांसोबतही काम करण्याचे आवाहन केले.
उद्योजकांनी विविध महत्त्वाकांक्षा मांडल्या. स्कायरूट एरोस्पेसचे सह-संस्थापक आणि सीईओ, पवन कुमार चंदना यांनी १८ जुलैच्या कक्षीय मोहिमेनंतर रॉकेट उत्पादन आणि प्रक्षेपणांचा विस्तार करण्याच्या योजनांवर प्रकाश टाकला.
इतर कंपन्यांनी प्रगत प्रणोदन, जागतिक भू-स्थानक नेटवर्क, कक्षीय कचरा हटवणे, अवकाशात डॉकिंग आणि इंधन भरणे, अवकाश-आधारित औषध निर्मिती आणि कृषी अनुप्रयोग यांसारख्या योजनांचे वर्णन केले. सेरेंडिपिटी स्पेसच्या प्रतिनिधीने सांगितले ,की ते सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात औषधे तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करत आहेत, तर ऑर्बिटएड एरोस्पेस कंपनीने कक्षीय इंधन स्थानकांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनासह डॉकिंग आणि अवकाशात इंधन भरण्यावर काम करत आहे.
सहभागी झालेल्या २० स्टार्टअप्समध्ये स्कायरूट एरोस्पेस, अग्निकुल कॉसमॉस, पिक्सेल, ध्रुव स्पेस, गॅलॅक्सआय, पिअरसाइट, बेलाट्रिक्स एरोस्पेस, दिगंतरा, सॅटश्योर, सुहोरा टेक्नॉलॉजीज, मनस्तू स्पेस, ॲस्ट्रोबेस, टेकमी२स्पेस, व्योमिक, कॉस्मोसर्व्ह स्पेस, ऑर्बिटएड एरोस्पेस, स्कायसर्व्ह (हायस्पेस), सेरेंडिपिटी स्पेस, व्हॅसर लॅब्स आणि मिस्टईओ यांचा समावेश होता.
श्री. मोदी यांनी स्टार्टअप्सना, शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंतराळाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी अटल टिंकरिंग लॅब्ससोबत काम करण्याचे आवाहन केले.