वॉशिंग्टनः नोव्हेंबरमधील अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांनंतर इराणसोबतचे युद्ध संपुष्टात येईल, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी येथे व्यक्त केले आहे.. गेल्या सहा महिन्यांपासून चालू असलेल्या युद्धाच्या सुरवातीपासून दोन्ही बाजूंनी जहाजांवर केलेल्या हल्ल्यांच्या सर्वांत मोठ्या लाटेनंतर, त्यांनी इस्लामिक रिपब्लिकच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित असलेल्या एका स्थळावर पुन्हा हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
आखाती प्रदेशात तणाव वाढला आहे. येमेनच्या इराण-समर्थित हूतींसोबत संघर्ष उफाळून आल्याने, सौदी अरेबियाच्या नागरी संरक्षण अधिकाऱ्यांनी गुरुवारी नैऋत्येकडील खमिस मुशायत शहरात २४ तासांत चौथ्यांदा आणीबाणीचा इशारा जारी केला.
होर्मुझची सामुद्रधुनी आणि लाल समुद्र या दोन्हीमधून जाणारे पुरवठा मार्ग मोठ्या प्रमाणात विस्कळीत राहिल्याने, ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या वर स्थिरावल्या होत्या .
अमेरिकेने पाच इराणी तेलवाहू जहाजे बुडविल्यानंतर, इराणने बुधवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ १० जहाजांवर हल्ला केल्याचे दावा केला आहे. हा प्रतिहल्ल्यांच्या मालिकेतील नवीनतम हल्ला असून, यातून शत्रुत्व लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत.
युद्ध आणि त्यानंतर झालेल्या इंधन दरवाढीमुळे ट्रम्प यांची लोकप्रियता विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. त्यांनी सांगितले की, नोव्हेंबरमधील अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा इराण प्रयत्न करत आहे, या निवडणुकांवरून सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे काँग्रेसवरील नियंत्रण कायम राहील की नाही याचा निर्णय होईल.
उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्यासह व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागारांनी ट्रम्प यांना खासगीत इशारा दिला आहे की, हा संघर्ष त्यांच्या अध्यक्षपदाच्या उर्वरित काळात, म्हणजेच जानेवारी २०२९ मध्ये संपणाऱ्या कार्यकाळात वाढू शकतो.
ट्रम्प यांनी असेही म्हटले की, अमेरिका इराणच्या पिकॅक्स माउंटनवर हल्ला करू शकते . हे एक अत्यंत सुरक्षित ठिकाण असून, इराणच्या नुकसानग्रस्त नतान्झ युरेनियम संवर्धन केंद्राजवळ दोन खोल बोगद्यांचे हे संकुल आहे.