पुणे: माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) सोडून पुन्हा शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आढळराव पाटील मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.
आढळराव पाटील यांनी हे पाऊल घेतल्यामुळे आंबेगाव तालुका आणि उत्तर पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. पूर्वी दीर्घकाळ शिवसेनेत कार्यरत असलेले आढळराव पाटील काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थिती आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी पुन्हा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
आढळराव पाटील यांचा प्रवेश शिवसेना शिंदे गटासाठी मोठे राजकीय बळ ठरेल, तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये आढळराव यांचे प्रवेशाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गटात कार्यरत होते, परंतु पक्षात काही कार्यकर्त्यांकडून सन्मान न मिळाल्यामुळे आणि संभ्रम निर्माण होण्याच्या परिस्थितीमुळे अखेर त्यांनी पुन्हा शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या काही दिवसांत अधिकृत प्रवेशानंतर पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.