मुंबई: मुंबई महापालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) नवनिर्वाचित महापौर Ritu Tawde सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या अधिकृत वाहनावर लावलेल्या लाल आणि निळ्या फ्लॅशिंग दिव्यांमुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
केंद्र सरकारने २०१७ मध्ये सर्वसाधारण सरकारी वाहनांवर लाल दिवा, नामफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे वापरण्यास बंदी घातली होती. त्यामुळे महापौरांच्या वाहनावर लाल-निळे दिवे दिसल्यानंतर अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. गाडीवर छतावर लाल दिवा नव्हता, मात्र बोनेटजवळ लाल दिवा दिसत होता. या प्रकरणात महापौरांचा काहीच दोष नाही. राज्यात कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा नियम आधीपासूनच आहे आणि महापौरांनाही त्याची माहिती आहे. मला वाटते त्यांना विनाकारण टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
दरम्यान, महापौर तावडे यांच्या नव्या इनोव्हा गाडीवर छतावर दिवे नसले तरी समोरच्या फ्रंट ग्रिल किंवा बंपरजवळ लाल-निळे फ्लॅशिंग दिवे बसवलेले असल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या ताफ्यातील एका स्कॉर्पिओ वाहनावरही पोलिसांच्या वाहनांसारखे दिवे लावलेले असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पुन्हा व्हीआयपी संस्कृती सुरू होत असल्याची चर्चा रंगली आहे.
या प्रकरणावर माजी महापौर Kishori Pednekar यांनीही नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “मीही महापौर राहिले आहे. मला सांगितलेल्या नियमांनुसार मी सर्व प्रोटोकॉल पाळले होते. महापौर असताना मी कुटुंबासाठी दिली जाणारी गाडीही नाकारली होती. प्रोटोकॉलची माहिती घेणे आवश्यक असते. कोणाच्या सांगण्यावरून दिवे लावलेली गाडी वापरली, याचे स्पष्टीकरण द्यावे.”सध्या या प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू असून पुढे प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.