मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदूचेरी या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. तामिळनाडू, आसाम, केरळ, पुदूचेरी या राज्यांची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसोबत देशातील विविध राज्यातील विधानसभांच्या 8 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राहुरी आणि बारामतीसाठी 23 एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. तर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झाल्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी : 30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026
बारामतीत सुनेत्रा पवार लढणार…
बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जागेवर लढणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नसल्याची माहिती आहे. यामुळे या जागेवर दुसरे कोणी उमेदवारी अर्ज भरणार की बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार हे पाहावं लागेल.
राहुरीत प्राजक्त तनपुरे इच्छुक…
भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं 17 ऑक्टोबर 2025 ला निधन झाल्यानं ती जागा रिक्त होती. या जागेवर महाविकास आघाडी राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष या ठिकाणी उमेदवार देण्याची शक्यता आहे. माजी आमदार प्राजक्त तनपुरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपकडून राहुरीत कोणाला संधी दिली जाते पाहावे लागेल. शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या नावाची देखील चर्चा आहे.