पत्नीच्या लाच प्रकरणी मान यांच्या राजीनाम्याची मागणी…

Share

चंडीगड: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पत्नी गुरप्रीत कौर यांनी बलात्काराचे प्रकरण दाबण्यासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून भाजपनेही त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेससह पंजाबमधील इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही आम आदमी पार्टीच्या (आप) नेतृत्वाखालील सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. आरोपही खूप गंभीर आहेत. स्वतंत्र चौकशीशिवाय दुसरे काहीही चालणार नाही, असे भाजप नेते इक्बाल सिंग लालपुरा येथे म्हणाले.

मान यांच्या पत्नीने बलात्काराचे प्रकरण दाबण्यासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केल्याच्या तक्रारीसंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) पंजाब सरकार आणि तेथील पोलीस प्रमुखांना पाठवलेल्या नोटीसचा ते उल्लेख करत होते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दोन आठवड्यांच्या आत अहवाल मागवला आहे.

तक्रारदाराने असा आरोप केला, की एका निवृत्त न्यायाधीशाने जाहीरपणे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी संबंधित एका बलात्कार प्रकरणात ५ कोटी रुपयांची मागणी केली होती, असे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कार्यवाहीत म्हटले आहे.

वाद निर्माण झाल्यानंतर, गुरप्रीत कौर यांनी पंजाबचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रणजित सिंग यांना कायदेशीर नोटीस पाठवली. एनएचआरसी सदस्य प्रियांक कानुनगो यांच्या म्हणण्यानुसार, न्यायमूर्ती रणजित सिंग यांनीच ही तक्रार दिली होती. हे माजी न्यायाधीश काँग्रेस नेते सुखपाल खैरा यांचे मेहुणे आहेत.

आरोप करणे आणि निराधार दावे करणे सोपे आहे, पण आम्ही अशा सर्व आरोपांना थेट सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. मी भूतकाळात कधीही घाबरले नाही आणि आताही घाबरणार नाही. माझ्या विरोधात बोलणाऱ्या कोणीही आधी वस्तुस्थिती तपासून घ्यावी, अन्यथा, त्यांनी कायदेशीर नोटीस आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे गुरप्रीत कौर म्हणाल्या.

पंजाबमध्ये निवडणुका होण्याच्या काही महिने आधी निर्माण झालेल्या मोठ्या वादावरून शिरोमणी अकाली दलानेही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ही निवडणूक भाजप आणि अकाली दल युती लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आम्ही पंजाबचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांना या प्रकरणाची चौकशी करून आम्हाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही केंद्रीय गृह मंत्रालयाच्या महिला सुरक्षा विभागालाही याची माहिती दिली आहे, असे कानुनगो म्हणाले.

पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी या प्रकरणी मान यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर स्पष्टीकरण देताना, असे आरोप का करण्यात आले आणि नेमके प्रकरण काय आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे ते म्हणाले.

‘आप’च्या महिला आघाडीच्या प्रमुख अमनदीप कौर अरोरा यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने सुरू केलेल्या कायदेशीर कारवाईचा दाखला दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *