सुप्रिया सुळे अचानक ‘दूर’ का? बारामतीतील घडामोडींमागचं राजकीय गूढ गडद

Share

बारामती: अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर बारामतीत घडणाऱ्या प्रत्येक राजकीय हालचालीत पुढे पुढे दिसणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे या अचानक राजकीय पडद्यामागे गेल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर सुप्रिया सुळे केवळ बारामतीतच नव्हे, तर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडामोडींमधूनही पूर्णतः ‘गायब’ झाल्याचं चित्र आहे.

‘पुढे पुढे’ केल्याने ट्रोलिंग, पण माघार नाही

अजित पवारांच्या एक्झिटनंतर सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत आपणच आता पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीची सूत्रे हातात घेत असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला. सुनेत्रा पवारांचा हात धरून अजित पवारांचे दर्शन घडवणं असो किंवा प्रत्येक निर्णयात पुढाकार घेणं—या सगळ्यामुळे त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्या. मात्र, या टीकेचा फारसा परिणाम त्यांच्यावर झाल्याचं तेव्हा तरी दिसून आलं नव्हतं.

शपथविधीनंतर मात्र दिल्ली गाठली

मात्र, चित्र अचानक बदललं. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर अवघ्या तीन दिवसांत सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना झाल्या. त्यानंतर गेल्या चार-पाच दिवसांत त्या बारामती, मुंबई किंवा पुण्यातील कोणत्याही राजकीय घडामोडींमध्ये सहभागी झालेल्या दिसल्या नाहीत. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर सुरू झालेलं राजकीय रणकंदन, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांमध्येही सुप्रिया सुळे उघडपणे सहभागी झालेल्या नाहीत.

शरद पवार मात्र ‘ॲक्टिव्ह मोड’मध्ये

दुसरीकडे, शरद पवार मात्र पूर्णतः सक्रिय झालेले दिसतात. गोविंद बागेतून सहयोग सोसायटीपर्यंत त्यांच्या भेटी, पत्रकार परिषदांचा धडाका, पार्थ पवार, रोहित पवार आणि जय पवार यांना दिलेलं मार्गदर्शन यामुळे पवार कुटुंबातील राजकीय दिशा स्पष्टपणे शरद पवार ठरवत असल्याचं चित्र समोर आलं आहे. अजित पवारांच्या स्मारकापासून ते भविष्यातील राजकीय वाटचालीपर्यंत सर्व विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केल्याचं रोहित पवारांनीही स्पष्ट केलं आहे.

‘सुनेत्रा काकींमध्ये अजितदादा दिसतात’ – रोहित पवार

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानावेळी संपूर्ण पवार कुटुंब एकत्रितपणे काटेवाडीच्या मतदान केंद्रावर दिसून आलं. त्यानंतर रोहित पवारांनी केलेलं वक्तव्य विशेष लक्षवेधी ठरलं. “सुनेत्रा काकींमध्येच आम्हाला अजितदादा दिसतात. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अजितदादांची सर्व खाती यावीत, तसेच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष व्हाव्यात, अशी आमची इच्छा आहे,” असं रोहित पवार म्हणाले. तसेच 12 फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

पार्थ पवार ‘फ्रंटफुट’वर?

या सगळ्यातच शरद पवारांनी पार्थ पवारच्या पारड्यात आपलं वजन टाकल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे तरुण नेतृत्वाकडे, म्हणजेच पार्थ पवारकडे द्यावीत आणि त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवावं, असा आग्रह शरद पवारांनी धरल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या ठरल्या आहेत.

सुप्रिया सुळे ‘दूर’ का? प्रश्न अनुत्तरित

मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये सुप्रिया सुळे कुठेच दिसत नाहीत, हेच सर्वात मोठं गूढ ठरत आहे. राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणावर त्यांची भूमिका काय? पार्थ पवारांच्या नेतृत्वाबाबत त्यांचं मत काय? शरद पवारांचा हा ‘नवा राजकीय डाव’ आहे का—ज्यात आधी सुप्रिया सुळे यांचं महत्त्व वाढवायचं आणि नंतर ज्युनिअर विरुद्ध सीनियर असा संघर्ष निर्माण करून एकत्रित राष्ट्रवादीवर सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व प्रस्थापित करायचं?

हे सगळे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. कारण शरद पवारांना हे सवाल विचारले गेलेले नाहीत आणि सुप्रिया सुळे उत्तर देण्यासाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे बारामतीच्या राजकारणातलं हे गूढ आणखी गडद होत चाललं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *