मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील दोन महिन्यांत मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हं दिसत असून, विशेषतः राज्यसभा निवडणुकीमुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे. 2 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत असून, या जागांसाठी कोणाची वर्णी लागणार यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
2020 मध्ये राज्यसभा निवडणूक झाली तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यामुळे त्या वेळी मविआच्या चार तर भाजपच्या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली असून, सत्ताधारी महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे यंदा महायुतीच्या वाट्याला सहा तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुनेत्रा पवारांची जागा रिक्त
या निवडणुकीदरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठीही निवडणूक होण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या सोशल मीडिया बायोमध्ये ‘Ex Member of Parliament’ असा उल्लेख केल्याने त्यांनी राज्यसभेची खासदारकी सोडल्याचं स्पष्ट झालं आहे.
2020 मधील निवडणूक आणि बदललेली परिस्थिती
मार्च 2020 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे तीन खासदार निवडून गेले होते.
महाविकास आघाडीकडून शरद पवार, फौजिया खान, प्रियांका चतुर्वेदी आणि राजीव सातव, तर भाजपकडून डॉ. भागवत कराड, उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले राज्यसभेवर गेले होते.
यानंतर कोरोनामुळे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन झाले. त्यांच्या जागी रजनी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. उदयनराजे भोसले लोकसभेत निवडून गेल्यानंतर त्यांच्या जागी धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. या सर्वांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे.
असे आहे मतांचं गणित
सध्याच्या विधानसभेतील संख्याबळानुसार राज्यसभेसाठी एका उमेदवाराला 37.5 मतांची आवश्यकता आहे. या गणितानुसार
भाजप : 4 जागा
शिंदे गट : 1 जागा
अजित पवार गट : 1 जागा
महाविकास आघाडी : 1 जागा
अशी स्थिती सहज तयार होते.
विधानसभेतील सध्याचं संख्याबळ
महायुती
भाजप : 131
शिंदे गट : 57
अजित पवार गट : 40
महाविकास आघाडी
शिवसेना (ठाकरे गट) : 20
काँग्रेस : 16
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 10
इतर
अपक्ष : 7
समाजवादी पक्ष : 2
एमआयएम : 1
रिक्त जागा : 2
शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं यापूर्वी स्पष्ट केलं होतं. तसेच, राज्यसभेची मुदत संपल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सूचित केलं आहे. त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. पवारांनी राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यास ते सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा संकेत असल्याची चर्चा रंगली आहे.
ज्यांची मुदत संपत आहे ते खासदार
भाजप
डॉ. भागवत कराड
धैर्यशील पाटील
रामदास आठवले (रिपाई)
राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवार
फौजिया खान
शिवसेना
प्रियांका चतुर्वेदी
काँग्रेस
रजनी पाटील