जिल्हा परिषद निवडणुक! रामदास कदमांची सुनील तटकरे व भास्कर जाधवांवर घणाघाती टीका

Share

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आरोप–प्रत्यारोपांची धुमश्चक्री, शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी व ठाकरे गट

कोकण: जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून विविध पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप–प्रत्यारोप करत आक्रमक झाले आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप कदम यांनी केला. शरद पवार यांना शह देण्यासाठी तटकरे यांनी अजित पवार यांच्या पत्नीला घाईघाईत शपथ घ्यायला भाग पाडल्याचे ते म्हणाले.

“अजित पवार यांच्या चितेची आगही पूर्णपणे विझली नव्हती, त्याआधीच वहिनींना शपथ घ्यायला लावण्यात आलं. दहा दिवस थांबलं असतं तर काय बिघडलं असतं?” असा सवालही कदम यांनी उपस्थित केला. शरद पवार ताबा घेतील या भीतीपोटीच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तटकरेंची ही कृती निंदनीय असून महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही, असेही कदम म्हणाले.

सुनील तटकरे विश्वासघातकी असून ज्यांनी त्यांना मोठं केलं, त्यांनाच संपवण्याचं काम त्यांनी केल्याचा आरोपही कदम यांनी केला. लोकसभेत तटकरे यांना आपण निवडून आणल्याचा दावा करत, मात्र योगेश कदम यांचा पराभव व्हावा यासाठी तटकरे यांनीच प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेलाही रामदास कदम यांनी तीव्र प्रत्युत्तर दिलं. “भास्कर जाधव यांचा तोल गेला आहे. गुहागर मतदारसंघात पराभव स्पष्ट दिसत असल्याने ते अशा प्रकारची भाषा वापरत आहेत. भुंकणाऱ्यांकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही,” अशी टीका कदम यांनी केली.

1995 मध्ये भास्कर जाधव यांना आमदारकी मिळवून देण्यात आपली भूमिका असल्याचा दावा करत, त्यांना शिवसेनेत आणल्याचाही उल्लेख कदम यांनी केला. यावेळी त्यांनी काही वैयक्तिक आरोप करत जाधवांना थेट आव्हान दिलं.प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अशा तीव्र आरोप–प्रत्यारोपांमुळे कोकणातील राजकीय वातावरण अधिकच तापल्याचं स्पष्ट दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *