नवी दिल्ली: विरोधी पक्षांना निवडणुकांमधील सलग पराभव पचविता येत नसल्याने द्वेषपूर्ण भाषा वापरली जात असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत केली. “काँग्रेस कधीही माझी कबर खोदू शकणार नाही” असे ठाम शब्दांत सांगत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या ठरावाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकसभेत विरोधकांनी केलेला गदारोळ हा केवळ आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपतींचाच नव्हे, तर सर्वोच्च घटनात्मक पदाचा आणि भारतीय संविधानाचाही अपमान आहे.
सुमारे १०० मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी सरकारच्या योजनांची अंमलबजावणी, आर्थिक सुधारणा आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. भारत आज ‘ग्लोबल साऊथ’चा मजबूत आवाज बनला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्याबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या ‘देशद्रोही’ या टिप्पणीचा पंतप्रधानांनी तीव्र निषेध केला. “हे उद्गार संपूर्ण शीख समाजाचा अपमान आहेत” असे ते म्हणाले.
पश्चिम बंगालच्या मुद्द्यावर बोलताना मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील सरकार घुसखोरांचे संरक्षण करत असल्याचा आरोप केला. तसेच *‘मोहब्बत की दुकान’*ची भाषा करणारेच ‘मोदी तेरी कबर खुदेगी’ अशा घोषणा देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“माझ्यासारखा गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधानपदापर्यंत पोहोचला आणि टिकून राहिला, हेच विरोधकांना सहन होत नाही. काँग्रेसमधील एका परिवाराला पंतप्रधानपद ही आपली जहागिरी असल्यासारखी वाटते,” अशी टीकाही मोदी यांनी केली.
सरकारने २५ कोटी गरीब नागरिकांना दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढल्याचे, तसेच वीज न पोहोचलेल्या १८ हजार गावांमध्ये वीज पुरवठा केल्याचे त्यांनी सांगितले. “देशाच्या सैनिकांसाठी तिजोरी उघडली. याच निर्णयांमुळे विरोधक कबर खोदण्याची भाषा करीत आहेत,” असे ते म्हणाले.
भारताची ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’ वेगात; २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे ध्येय निश्चित
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ११ वर्षांतील सरकारच्या कामगिरीचा आढावा घेताना सांगितले की, उच्च आर्थिक विकासदर आणि नियंत्रित महागाई ही भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद आहे. भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबत झालेल्या अलीकडील व्यापार करारांमुळे जागतिक स्तरावर भारतातील स्थैर्याबाबतचा विश्वास वाढल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “भारताची रिफॉर्म एक्स्प्रेस वेगात असून २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे ध्येय नक्की साध्य होईल,” असा ठाम विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.