महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपकडून कोण? विनोद तावडे, आठवले, सहस्रबुद्धेंची नावे चर्चेत

Share

मुंबई: महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्यात येणाऱ्या नेत्यांच्या नावांबाबत भारतीय जनता पक्षात हालचालींना वेग आला आहे. यामध्ये ज्येष्ठ भाजप नेते विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून महाराष्ट्राबाहेर राहून बिहार विधानसभा निवडणूक तसेच पक्षाच्या विविध राष्ट्रीय जबाबदाऱ्या सांभाळणारे तावडे भाजपसाठी महत्त्वाचे नेते ठरले आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर कोणताही आक्षेप न घेता त्यांनी केंद्रात सक्रिय भूमिका निभावली. त्या वेळी त्यांना संधी का देण्यात आली नाही, हे अद्यापही गूढ मानले जाते. सध्या ते राष्ट्रीय स्तरावर जबाबदाऱ्या पार पाडत असले तरी महाराष्ट्रातील निवडणुकांमध्येही ते सक्रिय असतात. काही राज्यस्तरीय नेत्यांशी मतभेद असल्याच्या चर्चा असल्या, तरी पक्षातील त्यांचे स्थान पाहता त्यांची इच्छा असेल तर राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे भाजप नेत्यांचे मत आहे.

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनाही पुन्हा एकदा राज्यसभेची संधी दिली जाऊ शकते. भाजपच्या माध्यमातून सध्या ते राज्यसभेवर आहेत. दलित व अल्पसंख्याक मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव लक्षात घेता भाजपसाठी ते महत्त्वाचे मानले जातात. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी त्यांनी अलीकडेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

याशिवाय, राज्यसभेत प्रभावी कामगिरी करूनही मागील वेळी संधी न मिळालेले डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे नावही पुन्हा चर्चेत आहे. पीयूष गोयल यांच्यासाठी त्यावेळी सहस्रबुद्धेंचे नाव मागे घेण्यात आले होते. आता गोयल लोकसभेत निवडून गेल्याने सहस्रबुद्धेंना पुन्हा संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. बौद्धिक वर्तुळात तसेच धोरणात्मक नियोजनात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

भाजपकडे महाराष्ट्रातून राज्यसभेच्या चार जागांचे संख्याबळ असल्याने यावेळी महिला उमेदवारालाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजया रहाटकर यांचे नाव पुढे येते की अन्य कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपकडून अंतिम निर्णय कधी जाहीर होतो, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *